नवी दिल्ली - देशात पसरत असलेल्या कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनीमन की बात च्या माध्यमातून पुन्हा एकदा देशवासीयांशी संवाद साधला. यावेळी नरेंद्र मोदींनी अचानक घेतलेल्या लॉकडाऊनच्या कठोर निर्णयामुळे देशातील गरिबांना झालेल्या त्रासाबद्दल माफी मागितली. तसेच कोरोनाविरोधातील लढाई ही जीवन मरणाची लढाई असल्याचे सांगत मोदींनी लॉकडाऊनचा नियम तोडल्यास कोरोनापासून वाचता येणार नाही, असा सल्ला देशवासीयांना दिला.
मन की बात च्या माध्यमातून देशवासियांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, ''आज देश आणि संपूर्ण जग कोरोनाच्या संकटाशी झुंजत आहे. आपल्या देशासमोर आलेल्या संकटामुळे मला लॉकडाऊनसारखा कठोर निर्णय घ्यावा लागला आहे. या कठोर निर्णयासाठी मला माफ करा. मी सर्वांना घरात कोंडून ठेवले आहे. पण कोरोनापासून वाचण्यासाठी इतर कुठला पर्याय नव्हता.''
कोरोनापासून बाचावासाठी सर्व मानवजातीला संकल्प करावा लागणार आहे. कोरोनाविरोधातील लढाई म्हणजे जीवन मरणाची लढाई आहे. लॉकडाऊनच्या नियमाचे पुढच्या अनेक दिवसांपर्यंत पालन करावे लागणार आहे. तसेच काही लोक लॉकडाऊनचे पालन करत नसल्याचे दिसून आले आहे. आपल्याला लक्ष्मणरेषा आखून घ्यावी लागेल. मात्र लॉकडाऊनचा नियम तोडल्यास कोरोनापासून वाचता येणार नाही. इतर काही देशांनी याचा अनुभव घेतला आहे. त्यामुळे आवश्यक ती काळजी घ्या असे आवाहन मोदींनी केले.