हैदराबाद – तेलंगानामध्ये एक मनाला सुन्न करणारी घटना घडली आहे. आईचा कोरोनामुळे मृत्यू झाला त्यानंतर तिच्याच मृतदेहासमोर मुलानं नवरीच्या गळ्यात हार घातला. ही घटना संगारेड्डी जिल्ह्यातील ईस्माईल खानपेट येथील आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ईस्माइल खानपेट येथील पल्पानुरी रेणुका यांच्या तीन मुलांपैकी मधला मुलगा राकेशचा साखरपुडा ६ मे रोजी आणि लग्न २१ मे रोजी ठरलं होतं. त्यामुळे अमेरिकेत राहणारा राकेज लग्नासाठी त्याच्या घरी परतला होता. परंतु या काळात आई रेणुका यांना कोरोनाची लागण झाली. त्यामुळे तिला हॉस्पिटलला उपचारासाठी दाखल करावे लागले.
आपल्या आईची अशी अवस्था पाहून मुलगा राकेशनं साखरपुडा आणि लग्न स्थगित केले. आई लवकरच बरी होऊन घरी परतेल या आशेवर घरातील सगळी मंडळी बसली होती. त्याचवेळी रेणुका यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. रेणुका यांच्या जाण्यानं कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला. सगळ्यांनाच मोठा धक्का बसला. परंतु मुलाच्या लग्नासाठी आईनं खूप वाट पाहिली होती. त्यामुळे राकेशनं आईच्या मृतदेहासमोरच लग्न करण्याचा निर्णय घेतला. दु:खात असलेले नवरा-नवरी दोघांनी आई रेणुकाच्या मृतदेहासमोरच एकमेकांच्या गळ्यात हार घालून लग्नाचे विधी पार पाडले.
हे लग्न पाहून संपूर्ण गावात शांतता पसरली होती. बघणाऱ्याच्या प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी होतं. ज्याठिकाणी जल्लोषात लग्न लावलेली दिसतात, आनंद-उत्साह असतो. मात्र या लग्नानं प्रत्येकाचं ह्दय पिळवटून टाकलं होतं. अशाच परिस्थितीत दोघांचे लग्न पार पाडले. आई रेणुका यांचा भाऊ श्रीशैलम यांचाही १० दिवसांपूर्वी कोरोनामुळे मृत्यू झाला होता.
तेलंगाणामध्ये कोरोनाची परिस्थिती काय?
गुरुवारी तेलंगाणामध्ये ३ हजार ६१४ कोरोनाबाधित आढळले होते. त्यानंतर राज्यातील एकूण रुग्णसंख्या ५ लाख ६७ हजार पेक्षा जास्त झाली. तर १८ जणांच्या मृत्यूनंतर आतापर्यंत कोरोना मृतांचा आकडा ३ हजार २०७ पर्यंत पोहचला आहे. हैदराबाद महापालिका परिसरात सर्वाधिक ५०४ रुग्ण आढळले. तर नलगौंडा २२९, खम्मम येथे २२८ कोरोनाबाधित आढळले आहेत. राज्यात ३८ हजार २६७ रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. राज्यात रुग्णसंख्येत होणारी घट पाहता ३० मेनंतर राज्यातील लॉकडाऊन हटवण्याची शक्यता आहे.