भोपाळ – देशात कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी ३ मे पर्यंत लॉकडाऊन करण्यात आलं आहे. कोरोनाच्या धास्तीने लोक एकमेकांकडे संशयाच्या नजरेने पाहू लागले आहेत. मध्य प्रदेशातील भोपाळमध्ये असाच एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला. याठिकाणी एका मुलाने आपल्या वडिलांचे पार्थिव घेण्यास नकार दिला कारण वडील कोरोनाग्रस्त होते.
मंगळवारी या मुलाच्या वडिलांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. जिल्हा प्रशासनाने या मृतकाच्या मुलाला अनेकवेळा अंत्यसंस्कारासाठी आग्रह केला पण कोरोना संक्रमण होण्याच्या धास्तीने मुलाने वडिलांचे पार्थिवही घेतले नाही त्यामुळे अखेर तहसीलदाराने या मृतक रुग्णाला अंत्यसंस्कार करुन मुखाग्नी दिला.
या मुलाने जिल्हा प्रशासनाला पत्र लिहून वडिलांचा मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला. अशा परिस्थितीत तहसिलदाराने मुलाची भूमिका निभावली. ही घटना शुजालपूर येथील आहे. येथील रुग्णाचा २० एप्रिल रोजी कोरोनामुळे मृत्यू झाला होता. त्यांच्यावर भोपाळमधील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरु होते. जिल्हा प्रशासनाकडून वारंवार मृतकाच्या कुटुंबाला संपर्क साधला जात होता.
या रुग्णाचा मृत्यू झाल्यानंतर त्याचा मृतदेह शवपेटीत ठेवण्यात आला होता. जिल्हा अधिकाऱ्यांच्या अनेक आग्रहानंतरही कुटुंब तयार झालं नाही. मृतदेह ताब्यात घेतला तर मलाही कोरोना होईल अशी भीती मुलाने व्यक्त केली. या मुलाने जिल्हा प्रशासनाला एक पत्र पाठवलं त्यानंतर मृतक रुग्णांवर अंत्यसंस्कार करण्याची जबाबदारी जिल्हा प्रशासनाने घेतली. या पत्रात संदीप मेवाडा या मुलाने लिहिलं होतं की, त्यांचे वडील कोरोना संक्रमित होते त्यानंतर २० तारखेला त्यांचे निधन झाले. मी माझ्या मर्जीने वडिलांचा मृतदेह जिल्हा प्रशासनाला देत आहे. प्रशासनाने त्यांच्यावर अंत्यसंस्कार करावेत. कारण मला किट घालताही येत नाही अन् मला नियमही माहिती नाही असं त्याने पत्रात नमूद केले.
याबाबत तहसीलदार गुलाब सिंह बघेल म्हणाले की, आम्ही कुटुंबाला पीपीई किट्स देत होतो. पण कुटुंबात एकच मुलगा आहे आम्ही त्याचा जीव धोक्यात घालू शकत नाही असं कुटुंबाचे म्हणणं होतं. त्यामुळे कुटुंबाने पार्थिव घेण्यास नकार दिल्याने जिल्हा प्रशासनाकडून या मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यात आले.