नवी दिल्ली : लॉकडाऊनचा आजचा शेवटचा दिवस आहे. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी सकाळी १० वाजता देशाला संबोधित करणार आहेत. यामध्ये लॉकडाऊन वाढवितात की काही सूट देतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र, त्याआधीच काँग्रेसच्या अंतरिम अध्यक्षा सोनिया गांधी यांनी देशवासियांना संदेश दिला आहे.
सोनिया गांधी यांनी त्यांच्या ट्विटरवर व्हिडीओ पोस्ट करत लोकांना शांतता आणि संयम बाळगण्याची विनंती केली आहे. तसेच कोरोनाशी लढणाऱ्या आरोग्य सेवकांचे आभार मानले आहेत. याचबरोबर काँग्रेसचा प्रत्येक कार्यकर्ता देशवासियांची मदत करण्यास तयार असल्याचे म्हटले आहे.
''माझ्या प्रिय देशवासियांने, तुम्हा सर्वांना नमस्कार! कोरोनाच्या या संकटात तुम्ही तुमच्या घरामध्ये सुरक्षित असाल अशी आशा करते. सर्वात आधी या संकटात शांतता, धीर आणि संयम बाळगल्याने जनतेचे आभार मानते. तुम्ही लॉकडाऊनच्या नियमांचे पालन करत आहात अशी आशा करते. घरामध्ये रहा, वेळोवेळी हात धुवा. खूपच गरज असेल तरच घराबाहेर पडा. यावेळी मास्क, ओढणी लावून या लढाईमध्ये सहकार्य करावे, असे सोनियांनी म्हटले आहे.
लॉकडाऊनच्या काळात लोक खूप हाल अपेष्टांमधून जात आहेत. मात्र, तरीही लोक कोरोनाला हरविण्यासाठी मदत करत आहेत, यापेक्षा मोठी देशभक्ती काय असू शकेल? एवढ्या मोठ्या संकटाच्या काळात तुमच्या कुटुंबाने, पती, पत्नी मुलांनी जो त्याग आणि बलिदान दिले आहे ते कधीच विसरण्यासारखे नाही, असेही सोनिया गांधी पुढे म्हणाल्या.