नवी दिल्ली – गेल्या वर्षभरापासून कोरोना व्हायरसनं(Corona Virus) संपूर्ण जगासमोर मोठं आव्हान उभं केले आहे. आतापर्यंत लाखो लोकांनी कोरोनामुळे प्राण गमावलेत. त्यातच आता कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटनं पुन्हा एकदा सगळ्यांची चिंता वाढवली आहे. केंद्र सरकारने याबाबत सर्व राज्यांना पत्र लिहित सतर्कता बाळगण्याचा इशारा दिला आहे. विमानतळावर कडक तपासणी करा असे निर्देश केंद्राने सर्व राज्य सरकारला दिले आहेत.
दक्षिण आफ्रिका, बोत्सवाना, हॉंगकॉंगमध्ये सापडलेल्या नव्या कोरोना व्हेरिएंटची(New Variant of Corona) दहशत निर्माण झाली आहे. सिंगापूरने दक्षिण आफ्रिका आणि आसपासच्या देशातून येणाऱ्या प्रवाशांवर बंदी घातली आहे. याबाबत जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले आहे की, कोरोनाचा नवा व्हेरिएंट आढळला आहे. दक्षिण आफ्रिकेत व्हायरसचा म्यूटेशन मिळाला आहे. Covid 19 च्या व्हेरिएंटचे आतापर्यंत १०० जीनोम सीक्वेंस सापडलेत. त्यावर शोध सुरु आहेत. हा नवीन म्यूटेशन किती धोकादायक आहे आणि त्याचा मानवी शरीरातील इम्यून सिस्टमवर काय परिणाम होईल यावर अद्याप स्पष्टता नाही.
WHO मते, पुढील काही दिवसांत कोरोना व्हायरसचा नवा व्हेरिएंट B.1.1529 यावर काही बोलणं शक्य होईल. सध्या त्याला VE टॅग दिला आहे. पुढे Variant of Concern जसं होईल तसं त्याला ग्रीक नाव दिले जाईल. सध्या इतकचं सांगता येऊ शकतं की त्याचा प्रसार रोखायला हवा कारण हा व्हेरिएंट जितका पसरेल तितका त्याचा म्यूटेट होईल. कोरोना लसीचे डोस सर्वांनी घ्यावेत आणि सुरक्षित राहावं असं आवाहन सर्वांना करण्यात आले आहे.
केंद्र सरकारनं लिहिलं राज्यांना पत्र
केंद्र सरकारने सर्व राज्यांना अलर्ट केले आहे. सरकारने पत्र लिहून राज्यांना आदेश दिलेत की, सर्व आंतरराष्ट्रीय प्रवाशांची कठोर तपासणी करा. दक्षिण आफ्रिका, हाँगकाँग आणि बोत्सवाना येथून येणाऱ्या प्रवाशांची स्क्रिनिंग करा. केंद्रीय आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी राज्यांना पत्र लिहिलं आहे. तर दिल्लीत मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी DDMA बैठक बोलावली असून नव्या कोरोना व्हेरिएंटपासून बचाव करण्यासाठी तयार राहण्याच्या सूचना दिल्या आहेत.