नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूचा फैलाव रोखण्यासाठी नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालील केंद्र। सरकारने कंबर कसली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोनाचे संक्रमण थांबवण्यासाठी देशात लॉकडाऊनची घोषणा केली होती. त्यानंतर आज अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज देशातील गरीब, महिला आणि नोकरदारांसाठी 1 लाख 70 हजार कोटी रुपयांच्या पॅकेजची घोषणा केली आहे. विशेष बाब म्हणजे या पॅकेजमध्ये महिला वर्गाकडे विशेष लक्ष देण्यात आले आहे.
निर्मला सितारामन यांनी महिलावर्गासाठी विविध घोषणा केल्या आलेत. त्यामध्ये जनधन योजनेत नोंद असलेल्या महिला खातेदारांच्या खात्यात पुढील तीन महिने प्रत्येकी 500 रुपये जमा केले जातील. उज्ज्वला योजनेनंतर्गत 8.3 कुटुंबांना पुढील तीन महिने गॅस सिलेंडर मोफत मिळणार आहे.
देशातील महिला बचत गटांसाठी विनातारण कर्जाची मर्यादा दुप्पट करण्यात आली आहे. आता महिला बचत गटांना 10 ऐवजी 20 लाखांचे कर्ज मिळणार आहे. याचा लाभ देशातील 63 लाख महिला बचत गट आणि 7 कोटी महिलांना होईल.
तसेच कोरोना विरोधात लढणाऱ्या आशा वर्कर्सना 50 लाख रुपयांचे विमा संरक्षण मिळणार आहे. त्याबरोबरच गरीब विधवा महिलांनाही पुढील तीन महिने आर्थिक मदत मिळेल.