पुणे: इराणमधून लष्कराच्या विशेष विमानाने बुधवारी सायंकाळी १९५ भारतीयांना देशात परत आणले. त्यांच्यावर जैसलमेर येथील लष्करी स्वस्थता केंद्रातील विलगीकरण कक्षात प्रथमोपचार सुरू केले आहे. आतापर्यंत इराणमधून ४८४ भारतीयांना लष्कराने परत आणले. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. असे असले, तरी लष्कराची आरोग्य यंत्रणा त्यांच्यावर लक्ष ठेवून आहे.इराण येथे मोठ्या प्रमाणात भारतीय नागरिक आहेत. इराणमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. तेथील भारतीय नागरिकांवर उपचारासाठी इराण सरकारने असमर्थता दर्शविल्यानंतर भारत सरकारने लष्कर व हवाईदलाच्या मदतीने भारतीय आरोग्य पथक इराणला पाठवले होते. यासोबतच भारतीयांना परत आणण्यासाठी विशेष मोहीमही राबविण्यात येत आहे. याअंतर्गत बुधवारी तिसºया खेपेत जवळपास १९५ भारतीयांना सुरक्षित देशात आणले. परदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणीसाठी तसेच उपचारासाठी लष्करातर्फे जैसलमेर येथे लष्करी स्वस्थता केंद्र उभारले आहे. जागतिक दर्जाच्या आरोग्य सुविधा याठिकाणी उपलब्ध करून दिल्या आहेत. सर्व नागरिकांना येथे ठेवले आहे. संशयित रुग्णांसाठी विशेष विलगीकरण कक्ष तयार केले आहे. त्याठिकाणी कोरोनाच्या प्राथमिक चाचण्या तसेच नमुने घेऊन त्या तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविल्या आहेत. शुक्रवारी (दि.१३) २३६ नागरिकांना इराण येथून भारतात आणले होते. रविवारी (दि.१५) ५३ भारतीयांना भारतात परत आणले. बुधवारी (दि.१८) १९५ भारतीयांना भारतात परत आणले आहे. सर्व नागरिक लष्करी स्वस्थता केंद्रातील आरोग्य सुविधांचा लाभ घेत आहे. सर्व नागरिकांची प्रकृती स्थिर आहे. सर्व नागरिकांच्या आरोग्य सुविधांबरोबरच त्याच्या खानपानाचीही व्यवस्था लष्कराकडून करण्यात येत आहे.