हैदराबाद - कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी करण्यात आलेल्या देशव्यापी लॉकडाऊनची मुदत रविवारी संपत आहे. दरम्यान, या लॉकडाऊनमुळे हातावर पोट असलेले अनेक मजूर देशातील विविध भागात अडकून पडले आहेत. तसेच यापैकी अनेक जण मिळेल त्या मार्गाने आपल्या घरी परतण्यासाठी प्रयत्न करत आहेत. दरम्यान, लॉकडाऊनच्या अटीशर्थींमध्ये सूट देऊन मजुरांना घरी परतण्याची सशर्त परवानगी देण्यात आली आहे. त्यानंतर विविध राज्यांची सरकारे आपल्या राज्यातील मजुरांना परत आणण्यासाठी काम सुरू केले आहे. दरम्यान तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथे अडकलेल्या परप्रांतीय मजुरांना घेऊन एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन आज झारखंडला पोहोचेल. या ट्रेनमधून एकूण १२०० मजूर प्रवास करत आहे.
विविध राज्यात अडकलेल्या मजुरांना घेऊन येण्यासाठी विशेष ट्रेनची व्यवस्था करण्यात यावी ,अशी विनंती विविध राज्य सरकारांनी केंद्र सरकारकडे केली होती. दरम्यान, शुक्रवारी पहाटे ५ वाजता तेलंगाणामधील लिंगमपेल्ली येथून एक विशेष ट्रेन रवाना झाली आहे. ही ट्रेन रात्री ११ वाजता झारखंडमधील हातिया येथे पोहोचेल. या ट्रेनमध्ये एकूण १२०० मजूर असून, फिजिकल डिस्टंसिग राहावे म्हणून एका डब्यात केवळ ५६ मजुरांना बसण्याची परवानगी देण्यात आली आहे.
विविध ठिकाणी अडकलेल्या मजुरांना परत आणण्यासाठी विशेष ट्रेनची सुरुवात अद्याप झालेली नाही. मात्र राज्य सरकारांनी केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर ही विशेष् ट्रेन सोडण्यात आली आहे. अशा प्रकारे सोडलेली ही एकमेव ट्रेन आहे. मात्र पुढे राज्य सरकार आणि रेल्वेच्या सूचनेनंतरच अशा प्रकारची ट्रेन सोडली जाईल.
झारखंड सरकारने दिलेल्या माहितीनुसार झारखंडमधील सुमारे ९ लाख लोक पररज्यात अडकून पडले आहेत. यापैकी ६.४३ लाख मजूर आहेत. तर उर्वरित लोक हे नोकरी आणि अन्य कामानिमित्त गेलेले आहेत. दरम्यान, केंद्राने प्रसिद्ध केलेल्या मार्गदर्शक तत्वानुसार बिहार, राजस्थान, महाराष्ट्र आणि झारखंड या राज्यांनी बाहेर अडकलेल्या लोकांसाठी विशेष ट्रेन सुरू करण्याची मागणी केली होती.