नवी दिल्ली : काेराेनाची रुग्णसंख्या झपाट्याने वाढत असल्यामुळे संपूर्ण देशाच्या चिंतेत वाढ झाली आहे. संसर्ग राेखण्यासाठी केंद्र सरकारने नव्या मार्गदर्शक सूचना जारी केल्या असून सर्व राज्ये व केंद्रशासित प्रदेशांनी चाचण्या वाढविण्याच्या सूचना दिल्या. तसेच लसीकरणाचा वेग वाढविण्याचे सांगण्यात आले आहे. नव्या मार्गदर्शक सूचना १ एप्रिलपासून लागू हाेणार आहेत.
केंद्र सरकारने ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ या त्रिसूत्रीचे कठाेरपणे पालन करण्याचे निर्देश केंद्राने दिले. स्थानिक परिस्थितीचा आढावा घेऊन गरज भासल्यास जिल्हा, तालुका, शहर किंवा प्रभाग पातळीवर निर्बंध घालू शकतात, असे केंद्राने स्पष्ट केले आहे. कोरोनासंदर्भात चिंतेत भर टाकणारी आकडेवारी आली आहे. देशभरात गेल्या २४ तासांमध्ये ४० हजार ७१५ नवे रुग्ण वाढले आहेत. काेराेना रुग्णांच्या संख्येत सलग तेराव्या दिवशी वाढ नाेंदविण्यात आली आहे. सक्रिय रुग्णसंख्या आता ३ लाख ४५ हजार ३७७ वर पाेहाेचली आहे. सततच्या रुग्णवाढीमुळे रिकव्हरी रेट ९५.६७ टक्क्यांवर आला आहे.
चिंताजनक बाब म्हणजे रुग्णसंख्या दुप्पट हाेण्याचा दर ५०४.४ दिवसांवरुन २०२.३ दिवसांवर आला आहे. ही घट १ मार्च ते २३ मार्च या कालावधीत झाली आहे. यावरून काेराेनाचा संसर्ग किती वेगाने पुन्हा पसरू लागला आहे, याची कल्पना येईल. महाराष्ट्रासह सहा राज्यांमध्ये रुग्णसंख्येत माेठी वाढ झाली आहे.
काय म्हटले केंद्राने?
- आरटी-पीसीआर चाचण्या वाढवा
- ‘टेस्ट-ट्रॅक-ट्रीट’ त्रिसूत्रीचे पालन करा
- गरज भासल्यास स्थानिक पातळीवर निर्बंध लागू करा
- लसीकरणाचा वेग वाढवा
- व्यक्ती तसेच वस्तूंच्या आंतरराज्य तसेच राज्यांतर्गत हालचालींवर निर्बंध नाही
- कंटेनमेंट झाेनबाहेर सर्व हालचालींना परवानगी राहणार