Coronavirus: राजकीय नेत्यांनी ताब्यात ठेवलेली औषधे आरोग्य खात्याकडे जमा करा; हायकोर्टाचे आदेश
By ऑनलाइन लोकमत | Published: May 18, 2021 07:35 AM2021-05-18T07:35:21+5:302021-05-18T07:35:38+5:30
दिल्ली उच्च न्यायालय; पोलिसांनी नीट तपास केला नाही
नवी दिल्ली : कोरोना रुग्णांच्या उपचारांसाठी लागणारी औषधे राजकीय नेत्यांनी आपल्या ताब्यात न ठेवता ती आरोग्य खात्याला परत करावीत असा आदेश दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी दिला आहे. राजकीय नेत्यांनी औषधे ताब्यात ठेवल्याबद्दल दिल्ली पोलिसांनी नीट तपास केला नाही तसेच प्रकरणांवर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला असे ताशेरेही न्यायालयाने ओढलेआहेत.
आमच्याकडे असलेली औषधे जनतेच्या हितासाठी असून त्यातून कोणताही राजकीय लाभ मिळविण्याचा हेतू नाही असा राजकीय नेत्यांचा दावा असतो. तर मग त्यांच्याकडे असलेली कोरोना उपचारांसाठीची औषधे नेत्यांनी त्वरित आरोग्य खात्याकडे जमा केली पाहिजेत असे दिल्ली उच्च न्यायालयाने म्हटले आहे .न्यायालयाने म्हटले आहे की, एखादा नेता लोकांना मोफत औषधे देणार असल्याचे जाहीर करतो. ही औषधे या नेत्याला कुठून मिळतात?
पोलिसांनी घेतला नेत्यांचा कैवार
कोरोनावरील औषधांचा काळाबाजार तसेच बेकायदेशीर वितरण सुरू असल्याबद्दल दिल्ली उच्च न्यायालयात एक जनहित याचिका दाखल करण्यात आली होती. अखिल भारतीय युवक काँग्रेसचे अध्यक्ष श्रीनिवास बी. व्ही. यांच्यासह अनेक नेते नि:स्वार्थी बुद्धीने जनतेला कोरोनावरील औषधांचे वाटप करत आहेत अशी बाजू दिल्ली पोलिसांनी न्यायालयात मांडली होती. हा युक्तिवाद दिल्ली उच्च न्यायालयाने अमान्य केला.