नवी दिल्ली: कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी लॉकडाऊन वाढवण्यात येत असल्याची घोषणा केली. त्यामुळे आता ३ मेपर्यंत देशात लॉकडाऊन असेल. मोदींनी देशवासीयांशी संवाद साधताना लॉकडाऊन वाढवत असल्याचं जाहीर केलं. यावेळी त्यांनी देशवासीयांच्या संयमांचं कौतुक केलं. लॉकडाऊनमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात बऱ्याच प्रमाणात मदत झाल्याचं ते म्हणाले. २१ दिवसांच्या लॉकडाऊननंतर काही प्रमाणात निर्बंध शिथिल करण्यात येतील, असा अंदाज वर्तवण्यात होता. मात्र मोदींनी सगळ्यांनाच जोरदार धक्का देत पुढील आठवडाभर निर्बंध कठोर केले जाणार असल्याचं सांगितलं.पुढील एक आठवडा कोरोना विरुद्धची लढाई आणखी कठोर होईल. निर्बंध वाढवले जातील, असं पंतप्रधान मोदी म्हणाले. २० एप्रिलपर्यंत प्रत्येक जिल्ह्यातल्या, प्रत्येक राज्यातल्या परिस्थितीवर अतिशय बारकाईनं लक्ष ठेवलं जाईल. परिस्थितीचा आढावा घेण्यात येईल आणि त्यानंतर लॉकडाऊनमध्ये लागू असलेले निर्बंध किती प्रमाणात शिथिल करायचे याबद्दलचा निर्णय होईल, असं म्हणत मोदींनी कोरोना विरुद्धच्या लढाईतील पुढची रणनीती सांगितली.एका आठवड्यानंतर जिल्ह्यांमधल्या, राज्यांमधल्या परिस्थितीचं मूल्यांकन केलं जाईल. कोरोनाला रोखण्यात यशस्वी झालेल्या भागांमध्ये काही प्रमाणात सवलती दिल्या जाऊ शकतात. मात्र ही सूट सशर्त असेल. लॉकडाऊनचे नियम मोडले जात असल्यास तातडीनं सगळ्या सवलती रद्द करण्यात येतील, असं मोदी म्हणाले. लॉकडाऊनचे नियम मोडल्यास कोरोना तुमच्या भागात प्रवेश करेल आणि मग देण्यात आलेल्या सवलती मागे घेण्यात येतील. त्यामुळे स्वत: बेजबाबदारपणे वागू नका आणि इतरांना बेजबाबदारपणे वागू देऊ नका, असं आवाहन त्यांनी केलं.