नवी दिल्ली : ओडिशातील जगप्रसिद्ध जगन्नाथ रथयात्रा यंदाच्या वर्षी कोरोना साथीमुळे आयोजित करू नका, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी दिला आहे. आम्ही यात्रेला परवानगी दिल्यास भगवान जगन्नाथ आम्हाला माफ करणार नाही, असेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.या ऐतिहासिक रथयात्रेत दरवर्षी लाखो भाविक सहभागी होतात. ही यात्रा यंदा आयोजित केल्यास त्यामुळे कोरोना साथीचा आणखी मोठ्या प्रमाणावर फैलाव होण्याची शक्यता आहे. त्यामुळे तिच्या आयोजनास सर्वोच्च न्यायालयाने मनाई केली आहे. जगन्नाथ पुरीची रथयात्रा येत्या २३ जूनपासून सुरू होणार होती. सरन्यायाधीश शरद बोबडे, न्या. दिनीश महेश्वरी, न्या. ए. एस. बोपण्णा यांच्या खंडपीठाने या प्रकरणी निकाल देताना सांगितले की, सार्वजनिक आरोग्य तसेच नागरिकांची सुरक्षितता या दोन्ही गोष्टी लक्षात घेऊन यंदाच्या वर्षी पुरी येथील जगन्नाथाची रथयात्रा आयोजित करण्यास परवानगी नाकारण्यात येत आहे. साथीच्या काळात ही यात्रा होऊ देणे उचित ठरणार नाही.
CoronaVirus News: जगन्नाथाची रथयात्रा आयोजित करण्यास सर्वोच्च न्यायालयाची मनाई
By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2020 3:31 AM