नवी दिल्ली – भारतातील कोरोनाग्रस्तांची संख्या ही वाढत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 21 दिवस संपूर्ण ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. दररोज लाखो लोक रेल्वेने प्रवास करतात. मात्र प्रवासादरम्यान कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका हा अधिक असल्याने रेल्वेसेवा बंद करण्यात आली. कोरोनामुळे केंद्र सरकारने पहिल्यांदाच देशात रेल्वेगाड्या बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी केंद्र सरकारने 22 मार्च ते 31 मार्चपर्यंत सर्व रेल्वेगाड्या बंद ठेवण्याचे जाहीर केले होते. मात्र मंगळवारी पंतप्रधान मोदींनी लॉकडाऊनची घोषणा केल्यावर रेल्वे प्रशासनानेही मेल, एक्स्प्रेस आणि पॅसेंजर रेल्वेसेवा 14 एप्रिलपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.
रेल्वे प्रशासनाने प्रवासी वाहतूक बंद असली तरी देशातील मालगाड्या सुरू राहणार असल्याचं स्पष्ट केलं आहे. सध्या केवळ मालगाड्याच सुरू असून, त्यातून अत्यावश्यक वस्तूंची ने-आण केली जात आहे. पण पॅसेंजर, एक्स्प्रेस यांपासून उपनगरी गाड्या तसेच मेट्रो रेल्वेही आता बंद आहे. याआधी 31 मार्चपर्यंत बंद असेल असा निर्णय घेण्यात आला होता. लॉकडाऊननंतर त्यात वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे देशातील प्रवासी रेल्वेसेवा 14 एप्रिल पर्यंत बंद करण्यात आली आहे. तसेच देशातील रेल्वेसेवा ठप्प असली तरी आवश्यक वस्तूंचा पुरवठा सुरू राहणार असल्याचं रेल्वे प्रशासनानं म्हटलं आहे.
लॉकडाउन असूनही लोक कोरोनाबाबत हवे तितके गंभीर नसल्याने रेल्वेने ट्विटर अकाउंटवरून देशातील लोकांना घराबाहेर पडू नका, असे आवाहन करताना आतापर्यंत रेल्वे कधीच थांबली नव्हती, महायुद्धाच्या काळातही रेल्वेगाड्या धावत होत्या, याचा उल्लेख केला आहे. युद्धकाळातही रेल्वे बंद झाली नाही, परिस्थितीचे गांभीर्य ओळखा, आपापल्या घरातच राहा, असे रेल्वेने म्हटले आहे. रेल्वेचा हा संदेश समाजमाध्यमांवर खूपच व्हायरल झाला आहे. सध्या रेल्वे बंद असली तरी लोक घराबाहेर पडताना दिसत आहे. संचारबंदी असूनही त्यांना कोरोनाचे गांभीर्य लक्षात आले नाही, असाच याचा अर्थ लावला जात आहे.
मुंबईत बॉम्बस्फोट झाले, दंगली झाल्या, अनेकदा प्रचंड पाऊ स झाला. पण रेल्वेची उपनगरी सेवा सुरूच राहिली. ती बंद करावी लागते, याचा अर्थच परिस्थिती अतिशय कठीण आहे. त्यामुळे आपण परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घ्यावे आणि घरीच थांबावे, असे मेसेज रेल्वेच्या ट्विटरचा उल्लेख करून एकमेकांना पाठविले जात आहेत.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाचा कहर! जगभरात तब्बल 18,892 लोकांना गमवावा लागला जीव
Coronavirus : २१ दिवस लॉकडाऊन; पंतप्रधान नरेंद्र मोदींची महत्त्वपूर्ण घोषणा
Coronavirus : पाकिस्तानची अर्थव्यवस्था कोलमडणार; इम्रान खान यांच्याकडून लॉकडाऊनची घोषणा