नवी दिल्ली : जगात कोरोनाची तिसरी लाट आलेली आहे. भारत सरकारनेही देशात तिसऱ्या लाटेचा धेाका असल्याचा इशारा सातत्याने दिला आहे. मात्र, लोकांकडून तो गांभीर्याने घेतला जात नसल्याचे दिसत आहे. हवामान खात्याच्या सूचनेप्रमाणे लोक या इशाऱ्याकडे दुर्लक्ष करीत आहेत, अशा शब्दांमध्ये केंद्र सरकारने नाराजी व्यक्त केली आहे.
आरोग्य मंत्रालयाच्या पत्रकार परिषदेत आरोग्य सहसचिव लव अग्रवाल यांनी नागरिकांना गाफील न राहण्याचा इशारा दिला. ते म्हणाले की, बाजारपेठा, पर्यटन स्थळे अशा ठिकाणी लोकांकडून कोरोना नियमावलीचे पालन होताना दिसत नाही. आम्ही तिसऱ्या लाटेचा इशारा देत आहोत. मात्र, लोक त्याकडे हवामान खात्याच्या एखाद्या अपडेटप्रमाणे पाहत आहेत. याचे गांभीर्य लोकांना नसल्याबद्दल अग्रवाल यांनी खंत व्यक्त केली. कोरोनाविरोधातील लढ्यात आतापर्यंत जे काही यश मिळविले आहे, ते असे केल्याने वाया जातील, असे अग्रवाल यांनी म्हटले आहे. निती आयाेगाचे सदस्य डॉ. व्ही. के. पॉल म्हणाले की, जगात कोरोनाची तिसरी लाट आली आहे. मात्र, भारतात ती येऊ नये यासाठी लोकांना गंभीर्याने प्रयत्न करावे लागतील.
चार राज्यांमध्ये ७३ टक्के नवे रुग्ण जुलैमध्ये नव्या रुग्णांपैकी सुमारे ७३.४ टक्के रुग्ण केरळ, महाराष्ट्र, तामिळनाडू, आंध्र प्रदेश आणि ओडिशा या राज्यांमध्ये आढळल्याची माहिती केंद्राने दिली आहे. १३ जुलैला संपलेल्या आठवड्याअखेर भारतातील ५५ जिल्ह्यांमध्ये पॉझिटिव्हिटी दर १० टक्क्यांहून अधिक आहे. ईशान्येकडील राज्यांमधील परिस्थिती चिंताजनक आहे. आसाम, मिझोरम, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूरसह १० राज्यांमध्ये केंद्रीय पथक मदतीसाठी पाठविण्यात आली होती.
धडकी भरविणारी छायाचित्रेदेशभरात बाजारपेठा तसेच थंड हवेच्या पर्यटन स्थळांवर लोकांनी प्रचंड गर्दी केली. पर्यटन स्थळांवर लोकांच्या प्रचंड गर्दीची धडकी भरविणारी छायाचित्रे व्हायरल झाली होती. ती पाहून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही चिंता व्यक्त केली होती.
‘डेल्टा व्हेरियन्ट’च्या रुग्णांमुळे धोका कायमकोरोनाच्या ‘डेल्टा व्हेरियन्ट’चे रुग्ण महाराष्ट्रातही आढळले आहेत. महाराष्ट्राप्रमाणेच हे रुग्ण इतर राज्यांतही आढळून येत आहेत. एकीकडे कोरोनाची रुग्णसंख्या कमी होत आहेत. मात्र, धोका टळलेला नाही. केरळमध्ये ‘झिका’ विषाणूचे रुग्णही वाढत आहेत.