नवी दिल्ली - देशात सार्वत्रिक लॉकडाऊनची घोषणा करून आठ दिवस होत आले तरी त्याचा म्हणावा तसा प्रभाव दिसून आलेला नाही. तसेच देशातील कोरोनाबधितांचा आणि मृतांचा आकडा वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आज सर्व राज्यांचा मुख्यमंत्र्यांशी संवाद साधला. सकाळी 11 वाजता व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सर्व राज्यांतील परिस्थिती मोदींनी जाणून घेतली. मोदींसोबत झालेल्या चर्चेनंतर अरुणाचल प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊन समाप्तीची तारीखच घोषित केली आहे.
पंतप्रधान आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनी आज कोरोना विषाणूमुळे सध्या देशात निर्माण झालेली परिस्थिती, कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजना, तसेच पुढील रणनीती यावर चर्चा केली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनीही मोदींशी व्हिडीओ कॉन्फरेन्सिंगद्वारे संवाद साधला. त्यावेळी, राज्यातील परिस्थिती आणि कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली. मात्र, अरुणाचल प्रदेशचेमुख्यमंत्री पेमा खांडू यांनी मोदींसमवेत झालेल्या संवादानंतर देशातील लॉकडाऊन कधी संपुष्टात येईल, यासंदर्भात घोषणाच केली. आपल्या ट्विटर अकाऊंवरुन पेमा यांनी १५ एप्रिल रोजी लॉकडाऊन संपणार असल्याचे म्हटले. मात्र, तरीही आपण सोशल डिस्टन्सींग आणि स्वच्छता, मास्कचा वापर हे नियम पाळायचे आहेत, गर्दीत जाणंही टाळायला हवे, असेही खांडू यांनी म्हटले होते. मात्र, खांडू यानी काही वेळातच आपलं ट्विट डिलीट केलंय. कदाचित लॉकडाऊन संपुष्टातची घोषणा करणे हे आपलं काम नाही, हे लक्षात आल्यानेच त्यांनी ते ट्विट डिलीट केलंय.
पेमा खांडू हे भारतीय जनता पक्षाचे नेते असून तरुण मुख्यमंत्री आहेत. उत्साहाच्या भरात त्यांनी लॉकडाऊन समाप्तीची एकप्रकारे घोषणाच केली होत. मात्र, चूक लक्षात येताच ते ट्विट डिलीट केलं. दरम्यान, देशात कोरोनाग्रस्तांच्या संख्येत मागील २४ तासांत ४०० ने वाढ झाली आहे. ही राष्ट्रीय स्तरावरील संक्रमणवाढ नसून, दिल्लीतील धार्मिक कार्यक्रमाला हजेरी लावलेल्यांनी प्रवास केल्यानंतर ही वाढ झाल्याचे प्राथमिकरीत्या समोर आले, असे आरोग्य मंत्रालयाने म्हटले.