नवी दिल्ली: देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. देशात गेल्या २४ तासांत देशात कोरोनाचे ९१८ नवे रुग्ण आढळले आढळल्याने रुग्णांची संख्या ९,२०४ वर पोहचली आहे. तसेच आतापर्यंत ३२९ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. परंतु जगभरातील इतर देशांमध्ये पसरलेला कोरोना आणि भारतामध्ये असलेला कोरोना व्हायरसचा वेगळा प्रकार आहे की काय असा प्रश्न आता तामिळनाडू सरकारला पडला आहे.
कोरोनाने अमेरिका, चीन, इटलीसह अन्य देशांमध्ये थैमान घातले आहे. मात्र भारताची लोकसंख्या पाहता अद्याप तरी अमेरिका इटलीच्या तुलनेत भारतात कोरोनाचा कमी प्रसार आहे. त्यामुळे जगातल्या माध्यमात भारताविषयी अनेक चर्चा सुरु आहेत. जगभरात प्रसारित करण्यात येत असलेल्या माध्यमात बीसीजी, हायड्रोक्सीक्लोरोक्विन आणि तापमान या तीन कारणांमुळे भारतात कोरोनाचा प्रादुर्भाव कमी असल्याची चर्चा केली जात आहे.
भारत, पाकिस्तान आणि बांग्लादेशात इतर देशांच्या तुलनेत कोरोनाचा प्रसार कमी असल्याचे दिसून येत आहे. याच पार्श्वभूमीवर काही विश्लेषकांनी ओपन सोर्स वेबसाइट नेक्स्टस्टाईनवर जाऊन या संबंधित कारणे शोधण्याचा प्रयत्न करत आहेत. वेबसाईटच्या संशोधन आकडेवारीवरून असे दिसून आले आहे की कोरोनाव्हायरसचे 8 ते 18 वेगवेगळे प्रकार आहेत. परंतु यामध्ये कोरोनाचे मोठ्या प्रमाणात काही बदल आहेत असं वाटत नसल्याचे दिसून येत आहे. मात्र भारतात काही कोरोनाबाधित झालेल्या रुग्णांमध्ये कोरोनाची लक्षणचं आढळली नाही. त्यामुळे भारतात असलेला कोरोनाचा इतर देशांपेक्षा वेगळा प्रकार आहे की काय असा प्रश्न तामिळनाडू सरकारला पडला आहे. तसेच भारतात असलेल्या कोरोनाविषाणूबाबत संशोधन व्हावे अशी मागणी देखील तामिळनाडू सरकारने केंद्र सरकारकडे केली आहे.
दरम्यान, जगभरातील कोरोनाग्रस्तांची संख्या सातत्याने वाढत असून गंभीर परिस्थिती निर्माण झाली आहे. वेगाने पसरणाऱ्या आणि भीतीचे वातावरण निर्माण करणाऱ्या कोरोनामुळे आतापर्यंत 114,247 हून अधिक लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. तर 1,853,155 लोकांना त्याचा संसर्ग झाल्याची माहिती मिळत आहे. तर 423,554 लोक बरे झाल्याची माहिती मिळत आहे. अमेरिका, चीन, इटली आणि स्पेनसारख्या देशात या व्हायरसने कहर केला आहे. या देशांमधील मृतांचा आकडाही दिवसेंदिवस वाढत चालला आहे.