चेन्नई - भारतातील कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होत असून आतापर्यंत 109 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनाग्रस्तांची संख्या ही 4000 वर पोहोचली आहे. कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशात 21 दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली आहे. तसेच सुरक्षिततेच्या दृष्टीने लोकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन केले आहे. याच दरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यात आली आहेत. मात्र इतर सर्व दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. केंद्र सरकारच्या या निर्णयामुळे देशातील तळीरामांची अडचण झाली आहे. दारुची दुकानं बंद असल्यामुळे पाच जणांनी आत्महत्या केल्याची घटना घडली होती. त्यानंतर आता दारू मिळाली नाही म्हणून तिघांनी पेंट वॉर्निश प्यायल्याची घटना समोर आली आहे.
तामिळनाडूतील चेंगलपेट जिल्ह्यात ही धक्कादायक घटना घडली आहे. दारू न मिळाल्यामुळे तीन जणांनी चक्क पेंट वॉर्निश प्यायल्याची घटना घडली. उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, या तिघांना दारू पिण्याची सवय होती. लॉकडाऊनमुळे दारुची दुकाने बंद आहेत. गेल्या काही दिवसांपासून दारू मिळत नसल्यानं ते तिघं त्याच्या शोधात फिरत होते. शेवटी दारू न मिळाल्याने पेंट वॉर्निशमध्ये पाणी मिसळून प्यायले.
पेंट वॉर्निश प्यायल्यानंतर या तिघांनाही उलट्या सुरू झाल्या. या त्रासानंतर त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये दारुची दुकानं बंद असल्यामुळे 5 दिवसांमध्ये 5 जणांनी आत्महत्या केल्याचं समोर आलं होतं. दारू न मिळाल्याने आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल लोक उचलत असल्याचं म्हटलं जात आहे. तसेच गेल्या काही दिवसांत केरळमधील व्यसनमुक्ती केंद्र आणि सरकारी रुग्णालयात मानसोपचारतज्ज्ञांकडे तपासायला येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारकडून अनेक उपाययोजना सुरू आहेत. कोरोनावर मात करण्यासाठी देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन सुरू आहे. भारतात दिवसेंदिवस कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत चालली आहे. सोमवारी आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, देशात कोरोना रुग्णांची संख्या 4000 हून अधिक झाली आहे. गेल्या 24 तासांत 32 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 693 कोरोनाचे नवे रुग्ण आढळले आहेत. कोरोना व्हायरसपासून रुग्णांचा बचाव करता यावा यासाठी सर्वच क्षेत्रातील लोक अहोरात्र काम करत आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : कोरोनाशी लढण्यासाठी सरकारचं 'आरोग्य सेतू' अॅप, 'त्या' व्यक्तींना करता येणार ट्रॅक
Coronavirus : प्रेरणादायी! ...म्हणून 6 महिन्यांच्या चिमुकलीला कुशीत घेऊन आई करतेय काम
CoronaVirus: कोरोनाविरुद्धच्या लढाईसाठी पंतप्रधानांच्या भाजपा कार्यकर्त्यांना पाच महत्त्वाच्या सूचना
CoronaVirus : देशात कोरोनाग्रस्तांचा आकडा ४००० पार, २४ तासांत ३२ जणांचा मृत्यू