नवी दिल्ली : देशाची दिग्गज कंपनी आणि कोरोनाच्या संकटामध्ये देशाला तब्बल दीड हजार कोटींची मदत करणाऱ्या टाटा ग्रुपला मोठा फटका बसला आहे. टाटाच्या मालकीची कंपनी जग्वारचे उत्पादन चीन सोडून बाहेरील प्रकल्पांमध्ये बंद करण्यात आले आहे. यामुळे सोमवारी शेअर बाजारात कंपनीच्या शेअरमध्ये मोठा चढ-उतार पहायला मिळण्याची शक्यता आहे.
टाटा मोटर्सच्या मालकीची कंपनी जेएलआरने म्हटले आहे की, कंपनीच्या मार्च तिमाहीतील उत्पादन ३०.९ टक्क्यांनी घटून १,०९,८६९ एवढे झाले आहे. यामुळे कंपनी खर्च आणि गुंतवणुकीसोबत उपलब्ध निधीचे योग्यप्रकारे नियोजन करणार आहे.
कोरोना व्हायरसमुळे कंपनीला अनेक देशांमध्ये उत्पादन बंद करावे लागले आहे. यामुळे आतापर्यंत टाटा मोटर्सच्या शेअरमध्ये ५८ टक्क्यांची घसरण झाली आहे. कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन घोषित करण्यात आले आहे. तसेच गाड्यांची विक्रीही ठप्प असल्याने फिंचने टाटा मोटर्सची रेटिंग (BB-) वरून (B) केली आहे. तसेच कंपनीचा आऊटलूकही नकारात्मक करण्यात आला आहे. याशिवाय अन्य एक रेटिंग एजन्सी एसअँडपी ग्लोबल यांनीही टाटा कंपनीचे रेटिंग घटवून (B+) वरून (B) केले आहे.
गेल्या आर्थिक वर्षामध्ये जग्वार लँड रोव्हरची विक्री १२.१ टक्क्यांनी घटून 5,08,659 एवढीच झाली होती. जेएलआरची विक्री सर्वच बाजारांमध्ये घटली आहे. उत्तर अमेरिकेमध्ये ७.५ टक्के, चीनमध्ये ८.९ टक्के, ब्रिटनमध्ये ९.६ टक्के, युरोपमध्ये १६.१ टक्के तर अन्य देशांमध्ये २०.३ टक्क्यांनी घसरणा झाली आहे.