हैदराबाद – चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने जगातील बहुतांश देशाला विळख्यात ओढलं आहे. चीनपेक्षाही अमेरिकेत कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. अमेरिकेत १ लाख ४२ हजारांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे तर २ हजार ४०० हून अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. कोरोना व्हायरसने भारतातही शिरकाव केला आहे.
कोरोना व्हायरसची लागण झालेल्यांची संख्या भारतात १ हजारांच्या वर गेली आहे तर २७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात महाराष्ट्रात १८६, केरळमध्ये १८२, कर्नाटक ७६, तेलंगणा ७० या चार राज्यात सर्वाधिक रुग्ण आढळून येत आहेत. तेलंगणामध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यूही झाला आहे. याचवेळी तेलंगणाचे मुख्यमंत्री के. चंद्रशेखर राव यांनी ७ एप्रिलपर्यंत तेलंगणा कोरोनामुक्त राज्य बनेल असा विश्वास व्यक्त केला आहे.
याबाबत मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले की, कोरोनाग्रस्त रुग्णांचे बरे होण्याचे प्रमाण वाढत आहे. कोरोनाचे नवीन रुग्ण कमी होत आहेत. जर लॉकडाऊनचं तंतोतंत पालन केले तर राज्यात येणाऱ्या काळात एकही कोरोनाबाधित रुग्ण आढळणार नाही. २२ मार्चपासून राज्यात लॉकडाऊन करण्यात आलं आहे. मुख्यमंत्र्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या बैठकीत कोविड १९ च्या परिस्थितीचा आढावा घेतला. त्यानंतर ते बोलत होते.
या बैठकीला पोलीस अधिक्षक, सर्व विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. आतापर्यंत २५ हजार ९३७ जणांना होम क्वारंटाईन केलं आहे. ७० रुग्णापैकी ११ रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. अनेक जणांच्या चाचण्या निगेटिव्ह आल्या आहेत. सोमवारी ११ जणांना डिस्चार्ज देणार आहोत. उरलेल्या ५९ रुग्णांपैकी ७५ वर्षाच्या एक रुग्ण वगळता उर्वरित रुग्ण लवकर बरे होतील. त्यांची प्रकृती स्थिर आहे. या सर्वांना ७ एप्रिलपर्यंत डिस्चार्ज दिलं जाईल. ७५ वर्षीय रुग्णाची प्रकृती गंभीर नाही पण त्यांना ठिक व्हायला वेळ लागणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
अशा परिस्थितीत राज्य लवकरच कोरोनामुक्त होईल अशी आशा आहे. आम्ही कठोरपणे लॉकडाऊनची अंमलबजावणी करत आहोत. एअरपोर्ट, सार्वजनिक वाहतूक आणि राज्याची सीमा बंद करण्यात आली आहे. त्यामुळे नवीन रुग्ण आढळण्याची शक्यता फारच कमी आहे असं मुख्यमंत्री केसीआर यांनी सांगितले.