नवी दिल्ली : ओमायक्रॉन विषाणूच्या अस्तित्वाचा शोध लागण्याआधीच त्याचा भारतात प्रसार झाला असण्याची शक्यता आहे. देशात तो आढळून आल्यास आश्चर्य वाटण्याचे कारण नाही, असे इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे (आयसीएमआर) साथीसंदर्भातील विभागाचे प्रमुख डॉ. समीरण पांडा यांनी म्हटले आहे.
दरम्यान, सौदी अरेबिया आणि दक्षिण कोरिया या देशांमध्ये ओमायक्रॉनची बाधा झालेला प्रत्येकी एक रुग्ण आढळला आहे. आफ्रिकन देशांत ओमायक्रॉनचे अस्तित्व पहिल्यांदा ९ नोव्हेंबर रोजी आढळले. पांडा म्हणाले की, दक्षिण आफ्रिका असो वा अन्य देश तिथून काही महिन्यांत अनेक प्रवासी जगभर गेले आहेत. त्यांच्यापैकी काही जणांना याची बाधा झाली असण्याचीही शक्यता आहे. त्यामुळे हा विषाणू भारतातही आढळून येऊ शकते. त्याच्या संसर्गाचा वेग जास्त आहे.
नियमित आंतरराष्ट्रीय विमानसेवा पुढे ढकलली कोरोनाच्या संसर्गामुळे गेले २० महिने बंद असलेली नियमित आंतरराष्ट्रीय प्रवासी विमानसेवा आता ओमायक्रॉन विषाणूमुळे आणखी पुढे ढकलण्याचा निर्णय नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाने (डीजीसीए) घेतला आहे. ही सेवा १५ डिसेंबरपासून सुरू करण्यात येईल, असे आधी जाहीर केले होते.
महाराष्ट्राची मार्गदर्शक तत्त्वे केंद्राप्रमाणेच हवीत दरम्यान, आंतरराष्ट्रीय प्रवाशांबाबत केंद्राने केलेल्या मार्गदर्शक तत्त्वांनुसार महाराष्ट्राने आपल्या नियमांत बदल करावा, अशी सूचना केंद्र सरकारने केली आहे. देशात सर्वच ठिकाणी सारखेच कोरोना प्रतिबंधक नियम असणे आवश्यक आहे, असे केंद्राने म्हटले आहे. -वृत्त/वर्ल्ड वाइड