नवी दिल्ली/चंदीगढ : पूर्व लडाखमधील पँगोंग त्सो या सरोवरानजीकच्या वादग्रस्त भागात आठवडाभरापूर्वी भारत आणि चीन यांचे सैन्य समोरासमोर आले होते आणि भारतीय हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी उड्डाणेही केली होती. आजही त्या विभागात तणाव कायम आहे.नियंत्रण रेषेच्या अलीकडे व पलीकडे असलेले सैन्य अतिशय दक्ष असून पाच व सहा मेच्या रात्री पँगोंग त्सोच्या उत्तर किनाऱ्यावरील फिंगर फाईव्ह या नावाने परिचित असलेल्या भागातील घटनेनंतर ‘माघार’ झाली होती.भारताच्या नियंत्रणाखाली असलेल्या भागात पायदळ तुकडी तैनात असली तरी अतिरिक्त तुकड्या कोणत्याही आणीबाणीच्या परिस्थितीला तोंड देण्यासाठी दक्ष अवस्थेत ठेवण्यात आल्या आहेत.सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार त्या भागात एप्रिलच्या शेवटी तणाव वाढल्यानंतर चीननेही आपले बळ वाढवले आहे. भारतीय लष्कराने स्पष्ट केले की, त्या भागात तुकड्यांना वाढवण्यात आलेले नाही. लष्कराचे जनसंपर्क अधिकारी कर्नल अमन आनंद मंगळवारी म्हणाले की, पँगोंग त्सो येथे सततचा संघर्ष नाही. त्या भागात सैन्य तुकड्या वाढवण्यात आलेल्या नाहीत. नियंत्रण रेषा पँगोंग त्सोमधून जाते. तलावाच्या पश्चिमेकडील ४५ किलोमीटरचा भाग भारताच्या नियंत्रणात असून, उर्वरित चीनच्या नियंत्रणात आहे.चीनच्या नियंत्रणाखालील मार्ग हा चुशूल अॅप्रोचमध्ये येत असून, भारताने केलेल्या मूल्यमापनानुसार कोणत्याही हल्ल्यामध्ये चीन ज्या अनेक मार्गांनी हल्ला करू शकतो त्यापैकी हा एक आहे. भारताचा दावा आहे की, नियंत्रण रेषा ही फिंगर आठशी को-टर्मिनस असली तरी तिचा प्रत्यक्ष ताबा फिंगर चारपर्यंतच्या भागावरच आहे.
coronavirus: लडाख नियंत्रण रेषेवर तणाव, अतिरिक्त तुकड्या तैनात केल्याचा भारताने केला स्पष्ट इन्कार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 14, 2020 5:13 AM