बंगळुरू : देशात ओमायक्राॅनचे जे पहिले दोन रुग्ण आढळले त्यांच्या संपर्कातील ५०० जणांची चाचणी करण्यात आली असून, त्यातील पाच जण कोरोनाबाधित आढळले. या रुग्णांना विलगीकरणात ठेवण्यात आले आहे.
ओमायक्रॉनचे रुग्ण देशात सर्वप्रथम कर्नाटकमध्ये आढळले होते. त्यापैकी एकाचे वय ६६ व दुसऱ्याचे वय ४६ वर्षे आहे. त्यातील ६६ वर्षे वयाचा गृहस्थ लसीचे दोन डोस घेऊन दक्षिण आफ्रिकेतून भारतात आला होता. त्याचा नमुना बंगळुरू विमानतळावर घेऊन तो पुढील तपासणीसाठी २० नोव्हेंबर रोजी पाठविण्यात आला. त्यात तो कोरोनाबाधित आढळल्याने त्याला हॉटेलमध्ये विलगीकरणात ठेवण्यात आले. दक्षिण आफ्रिकेच्या या नागरिकाने खासगी प्रयोगशाळेकडून कोरोना निगेटिव्ह अहवाल मिळविला व २७ नोव्हेंबर रोजी बंगळुरूहून दुबईला गेला. कर्नाटकातील दुसरा रुग्णाला ताप व अंगदुखी अशी लक्षणे होती. या रुग्णाच्या संपर्कात आलेल्या २१८ व्यक्तींची कोरोना चाचणी केली असता त्यातील पाच व्यक्ती बाधित असल्याचे निदर्शनास आले.
न्यू यॉर्कमध्ये पाच रुग्ण- अमेरिकेतील न्यू यॉर्कमध्ये ओमायक्रॉनची बाधा झालेले पाच रुग्ण सापडले आहेत. - मॅनहटन येथे नोव्हेंबरच्या अखेरीस झालेल्या एका कार्यक्रमाला उपस्थित राहून मिनेसोटा येथील आपल्या घरी परतलेल्या एका व्यक्तीलाही नव्या विषाणूची बाधा झाली. त्याचा या पाच रुग्णांमध्ये समावेश आहे. - त्यातील एकजण दक्षिण आफ्रिकेहून काही दिवसांपूर्वीच अमेरिकेत परतला आहे. ओमायक्रॉनचे रुग्ण आढळल्याने न्यू यॉर्कमध्ये पूर्वीपेक्षा अधिक दक्षता बाळगण्यात येत आहे.९ हजार २१६ नवे रुग्ण- ‘ओमायक्रॉन’ दाखल झाल्यानंतर सर्वत्र चिंता व्यक्त केली जात आहे. गेल्या २४ तासांमध्ये ९ हजार २१६ नवीन कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली. - ३९१ रूग्णांचा कोरोनाने बळी घेतला. शुक्रवारी देशाचा कोरोनामुक्तीदर ९८.३५ टक्के नोंदविण्यात आला.
आफ्रिकेतून कर्नाटकमध्ये आलेले १० जण बेपत्ताबंगळुरू : आफ्रिकेतील देशांमधून गेल्या काही दिवसांत बंगळुरूमध्ये आलेल्या नागरिकांपैकी १० जण बेपत्ता असल्याची धक्कादायक माहिती बंगळुरू महापालिकेचे आयुक्त गौरव गुप्ता यांनी दिली. त्यांचा शोध घेण्याचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. कर्नाटकमध्ये ओमायक्रॉनचे दोन रुग्ण आढळल्यानंतर घबराट निर्माण झाली असून त्यामुळे हे दहा जण दडून बसले असण्याची शक्यता आहे. गौरव गुप्ता यांनी सांगितले की, ओमायक्रॉनचा मुकाबला करण्यासाठी सर्व नागरिकांनी प्रतिबंधक उपायांचे काटेकोर पालन केले पाहिजे तसेच अधिक सावधानता बाळगली पाहिजे. कर्नाटकचे आरोग्यमंत्री डाॅ. डी. के. सुधाकर म्हणाले की, दक्षिण आफ्रिकेमध्ये नव्या विषाणूचे अस्तित्व आढळल्यानंतरच्या काही दिवसांत आफ्रिकी देशांतून बंगळुरूमध्ये ५७ प्रवासी आले आहेत. त्यातील १० जण बेपत्ता झाले आहेत. त्यांनी स्वत:चे मोबाइल बंद करून ठेवले आहेत. ओमायक्राॅनवर कोव्हॅक्सिन प्रभावी?नवी दिल्ली : भारत बायोटेकने बनविलेली कोव्हॅक्सिन ही स्वदेशी लस देशात सध्या उपलब्ध असलेल्या इतर लसींपेक्षा ओमायक्रॉनच्या संसर्गावर अधिक प्रभावी ठरण्याची शक्यता असल्याची माहिती इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या (आयसीएमआर) एका अधिकाऱ्याने नाव उघड न करण्याच्या अटीवर दिली.
आजाराची तीव्रता कमी असण्याची शक्यतावेगाने होत असलेले लसीकरण तसेच डेल्टा विषाणूचा आधीच झालेला मोठा प्रसार या दोन कारणांमुळे भारतात ओमायक्रॉन विषाणूमुळे होणाऱ्या कोरोनाची तीव्रता पूर्वीपेक्षा कमी असण्याची शक्यता केंद्रीय आरोग्य खात्याने व्यक्त केली आहे.