नवी दिल्ली : कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत प्रभावी ठरलेल्या कोव्हॅक्सिन या लसीच्या पुढील टप्प्यातील चाचण्यांना केंद्रीय औषध प्रमाण नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली आहे. २ ते १८ वयोगटातील मुलांच्या लसीकरणासाठी या चाचण्या घेण्यात येतील.कोरोनाप्रतिबंधक लसीकरण मोहिमेत सीरमची कोविशिल्ड आणि भारत बायोटेकची कोव्हॅक्सिन या दोन लसी प्रभावी ठरल्या आहेत. कोव्हॅक्सिन ही लस २ ते १८ वर्षे वयोगटातील मुलांनाही देता येईल किंवा कसे, हे पाहण्यासाठी या लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्यांसाठी सीडीएससीओच्या तज्ज्ञ समितीने मंजुरी दिली. भारत बायोटेकतर्फे तशी परवानगी समितीकडे मागितली होती. कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या व तिसऱ्या टप्प्यातील चाचण्या ५२५ जणांवर करण्यात येतील. दिल्ली व पाटण्यातील एम्स आणि नागपुरातील मेडिट्रिना इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेस या तीन ठिकाणी या चाचण्या केल्या जातील.
त्यांचा अभ्यास केला - कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या टप्प्यातील चाचण्यांचे निष्कर्ष अहवाल तज्ज्ञ समितीकडे सादर केल्यानंतर त्यांचा अभ्यास केला जाईल. - ते समाधानकारक असल्याचे स्पष्ट झाल्यानंतर पुढील टप्प्याला सुरुवात केली जाईल, असे समितीच्या सूत्रांनी स्पष्ट केले.