पुडुचेरी : पुडुचेरीमध्ये मुख्यमंत्र्यांसमवेत खासदार आणि आमदारांची कोरोना टेस्ट गुरुवारी करण्यात आली. देशातील पुडुचेरी पहिले राज्य आहे, ज्याठिकाणी विधानसभेत मुख्यमंत्र्यासोबत सर्व नेत्यांची कोरोना टेस्ट झाली आहे.
एएनआय या वृत्तसंस्थेच्या माहितीनुसार, पुडुचेरी विधानसभेत गुरुवारी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी, विधानसभा अध्यक्ष व्ही. पी. शिवकोलुंडू यांच्यासह सर्व मंत्री, खासदार आणि आमदारांची कोरोना टेस्ट करण्यात आली. कोरोनाची टेस्ट करण्यासाठी आरोग्य विभाग आणि डॉक्टरांचे एक पथक विधानसभा परिसरात दाखल झाले होते. यावेळी मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासह सर्व मंत्र्यांचे स्वॅब घेण्यात आले.
आरोग्य विभागाच्या सुत्रांनी सांगितले की, या मंत्र्यांचे आज घेण्यात आलेले कोरोना टेस्टचे रिपोर्ट शुक्रवारी मिळणार आहेत. दरम्यान, याआधी राज्याचे आरोग्यमंत्री मल्लादी कृष्ण राव यांनी बुधवारी (२२ एप्रिल) पत्रकार परिषदेत सांगितले होते की, "मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी यांच्यासह त्यांचे सर्व मंत्री, खासदार आणि आमदार आज (23 एप्रिल) विधानसभा परिसरात कोरोनाची टेस्ट करतील."
पुडुचेरीमध्ये आतापर्यंत कोरोना बाधित सात रुग्ण आहेत. यापैकी तीन जणांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यामुळे पुडुचेरीमध्ये देशातील इतर राज्यांपेक्षा कोरोनाग्रस्तांची संख्या फारच कमी आहे. मुख्यमंत्री नारायणसामी यांनी सांगितले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणल्याप्रकरणी राज्य सरकारचे कौतुक केले आहे.
मुख्यमंत्री व्ही. नारायणसामी म्हणाले, "पुडुचेरीमधील कोरोनोच्या परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी पंतप्रधानांनी फोनवर संपर्क साधला. त्यावेळी इंदिरा गांधी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयच्या रूग्णालयात फक्त तीन कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आहेत, असे मी त्यांना सांगितले. तसेच, आरोग्य आणि इतर विभागांनी संयुक्तपणे घेतलेल्या निर्णयांची त्यांना सविस्तर माहिती दिली. ज्यामुळे कोरोनाचा प्रादुर्भाव नियंत्रणात आणण्याची कामगिरीची चांगली झाली."