coronavirus: चाचण्या होताहेत कमी ,कुणी आमचं ऐकूनही घेत नाही; राहुल गांधींसमोर डॉक्टरने सांगितली मन की बात
By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 12:35 PM2020-07-01T12:35:34+5:302020-07-01T13:34:15+5:30
देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज डॉक्टर दिनानिमित्त या कोरोना योद्ध्यांना देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत.
नवी दिल्ली - देशात कोरोना विषाणूच्या थैमानामुळे सध्या मोठे संकट उभे राहिलेले आहे. देशभरातील डॉक्टर आणि वैद्यकीय कर्मचारी कोरोनाला रोखण्यासाठी प्रयत्न करीत आहेत. त्या पार्श्वभूमीवर आज डॉक्टर दिनानिमित्त या कोरोना योद्ध्यांना देशभरातून शुभेच्छा देण्यात येत आहेत. काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनीही त्यानिमित्त काही डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांशी चर्चा केली. यावेळी एका कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टराने राहुल गांधींसमोर एक धक्कादायक अनुभव शेअर केला.
केरळचे रहिवासी असलेले आणि सध्या दिल्लीतील एम्समध्ये रुग्णसेवा करत असलेले डॉ. विपीन म्हणाले की, दिल्लीमध्ये कोरोना चाचण्या खूप कमी प्रमाणात केल्या जात आहेत. तसेच लोकांना खूप अडचणींचा सामना करावा लागत आहे. मलासुद्धा कोरोनाचा संसर्ग झाला आहे. त्यामुळे सध्या मी क्वारेंटीन आहे,. तर माझी पत्नीही कोरोना पॉझिटिव्ह असून, तिला चाचणीसाठी सुमारे दहा तास वाट पाहावी लागली, अशी व्यथा या डॉक्टराने मांडली.
सध्या भारतात १२ लाख डॉक्टर आहेत. तर ३० लाखांहून अधिक नर्स आहेत. मात्र भारतातील खासगी आणि सरकारी रुग्णालयांमध्ये जमीन अस्मानाचा फरक आहे. येथील खासगी रुग्णालयांमध्ये वैद्यकीय कर्मचाऱ्यांचा पगार कापला जात आहे. त्यांना सरकारने मदत केली पाहिजे.
यावेळी कोरोनामुळे दिल्लीत निर्माण झालेल्या परिस्थितीबाबतही या डॉक्टरांनी धक्कादायक माहिती समोर आणली, दिल्लीमध्ये आधी दररोज केवळ ७ हजार कोरोना चाचण्या होत होत्या. मात्र जेव्हा चाचण्यांचे प्रमाण वाढले त्यानंतर पॉझिटिव्ह सापडणाऱ्यांचे प्रमाणही वाढू लागले. त्यामुळे दिल्लीमध्ये पुन्हा कोरोना चाचण्यांचे प्रमाण घटवण्यात आले. दिल्लीत कोरोनाबाधितांची संख्या पाच लाखांपर्यंत पोहोचण्याची भीती व्यक्त केली जात आहे. मात्र केवळ दहा हजार बेड्स उपलब्ध आहेत, अशाने कोरोनाविरोधात कसं लढता येईल.
दिल्लीमध्ये दोन नर्सचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दिल्ली सरकारने कोरोनाशी लढताना मृत्यू होणाऱ्या कोरोना योद्ध्यांना एक कोटी रुपये देण्याची घोषणा केली होती. मात्र ही रक्कम अद्याप देण्यात आलेली नाही, असेही डॉक्टरांनी सांगितले. त्याला उ्त्तर देताना राहुल गांधींनी मी याबाबत सरकारला पत्र लिहीन, असे सांगितले.
कुठलीही रणनीती बनवताना डॉक्टरांशी चर्चा केली पाहिजे. मात्र सध्या ते होत नाही आहे. तसेच दुसरी चिंतेची बाब म्हणजे ज्यांना कोरोना व्यतिरिक्त अन्य आजार आहेत. त्यांच्यावर उपचार होत नाही आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या