मुंबई - जगभरात कोरोना व्हायरसने थैमान घातले आहे. तो भारतातही आता वेगाने आपले हात-पाय पसरू लागला आहे. या पार्श्वभूमीवर कोरोनाचा सामना करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी लोकांना रविवारी जनता कर्फ्यूचे आवाहन केले होते. तसेच, कोरोना लॉक डाऊनकाळात अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्यांच्या सन्मानार्थ रविवारी सायंकाळी 5 वाजता आपआपल्या घरातून टाळ्या वाजवण्याचे आवाहनही मोदींनी जनतेला केले होते. त्यानुसार नागरिकांना प्रतिसादही दिला, सध्या सोशल मीडियावर पोलीस आणि वैद्यकीय क्षेत्रातील कर्मचारी आणि डॉक्टर्संचे कौतुक आहे. तसेच, स्वच्छतेसाठी झटणाऱ्या स्वच्छता कर्मचाऱ्यांचंही यात योगदान आहे. आता, पाँडेचरीच्या राज्यपाल किरण बेदींनीही ट्विटरवर एक फोटो शेअर करुन या सर्वांबद्दल कृतज्ञता व्यक्त केलीय.
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पोलीस प्रशासन, वैद्यकीय स्टाफ, स्वच्छता कर्मचारी हे अत्यावश्यक सेवा देत आपली जबाबदारी निष्ठेने पार पाडत आहेत. ऑन ड्युटी २४ तास सेवा देत या क्षेत्रातील कर्मचारी कोरोनाविरुद्धच्या लढाईत एखाद्या सैनिकाप्रमाणे लढत आहेत. त्यामुळे या सर्व लढवय्या कर्मचाऱ्यांबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कृतज्ञता व्यक्त करण्याचे आवाहन केले होते. मोदींच्या या आवाहनानुसार देशवासियांनी २२ मार्च रोजी सायंकाळी ५ वाजता आपल्या घराबाहेर येऊन, खिडकीत उभे राहुन आपली कृतज्ञता व्यक्त केली. आता, माजी आयपीएस अधिकारी आणि राज्यपाल किरण बेदी यांनी ट्विट करुन एक बोलकं चित्र शेअर केलं आहे.
किरण बेदी यांनी ट्विटरवर शेअर केलेल्या फोटोमध्ये पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स आणि स्वच्छता कर्मचारी यांच्या बोधचिन्हांचा वापर दिसून येतो. मात्र, या फोटोतील बोधचिन्हात आणखी एका क्षेत्राबद्दल आदर व्यक्त करण्याची गरज असल्याचे किरण बेदी यांनी म्हटलंय. टेलिफोनिक क्षेत्रातील कर्मचाऱ्यांशिवाय काहीही शक्य नाही. त्यामुळे दूरसंचार क्षेत्रातील कर्मचाऱ्यांचाही या फोटोत समावेश असायला हवा, अशी इच्छा किरण बेदी यांनी फोटो ट्विट करत व्यक्त केली आहे. नक्कीच हा फोटो जेवढा बोलका वाटतो, तेवढेच किरण बेदींची शब्दही खरे वाटतात.
दरम्यान, कोरोनाचा धोका टाळण्यासाठी महाराष्ट्र सरकारने अत्यावश्यक सेवा वगळता इतर सर्व बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र परिस्थिती गंभीर असतानाही लोक लॉकडाऊनची बंधने झुगारून घराबाहेर निघत असल्याचे दिसून येत होते. नागरिकांच्या बेजबाबदार वागणुकीमुळे राज्यात 31 मार्चपर्यत संचारबंदी लागू करण्याचा निर्णय सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहिर केला. तर, देशभरातील ३० राज्य आणि केंद्र शासित प्रदेशांमध्येही लॉक डाऊन आहे. आंतरराज्य आणि आंतरजिल्हा वाहतूकही बंद ठेवण्यात आली आहे.