नवी दिल्ली - देशातील कोरोना विषाणूचा वाढता फैलाव आणि अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झालेल्या आव्हानांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा करत आहेत. या चर्चेचा पहिला टप्पा आज पार पडला. यावेळी मुख्यमंत्र्याशी संवाद साधताना मोदींनी आपण कोरोनाला जेवढे रोखू , तेवढीच अर्थव्यवस्था उघडेल आणि रोजगाराच्या नवीन संधी निर्माण होतील, असे सांगितले. तसेच गेल्या काही आठवड्यात केलेल्या प्रयत्नांमुळे अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत मिळू लागले आहेत, असे विधान मोदींनी यावेळी केले.
यावेळी मोदी म्हणाले की, गेल्या काही आठवड्यांपासून करण्यात आलेल्या प्रयत्नांचे फळ आता दिसू लागले आहे. तसेच अर्थव्यवस्था रुळावर येण्याचे संकेत मिळू लागले आहे. खरिपाच्या लागवडीत गेल्या वर्षाच्या तुलनेत १२ ते १३ टक्क्यांनी वाढ झाली आहे. तसेच रिटेलमधील डिजिटल पेमेंट लॉकडाऊनपूर्वीच्या सुमारे ७० टक्क्यांवर पोहोचला आहे, देशाची अर्थव्यवस्था रुळावर येत असल्याचे हे संकेत आहेत, असे मोदींनी सांगितले.
देशातील अनेक राज्यांमध्ये शेती, बागबागायती आणि एमएसएमई हा अर्थव्यवस्थेचा मोठा भाग आहे. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत या क्षेत्रांसाठी उपायांची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे या क्षेत्रांना फायदा होईल. तसेच उद्योगांना वेगाने क्रेडिट मिळेल, त्यामुळे लोकांना रोजगार मिळेल, असे मोदींनी सांगितले.
दरम्यान, पूर्वोत्तर राज्ये आणि आदिवासी भागांमध्ये ऑर्गेनिक शेती करण्याची खूप संधी आहे. त्यासाठी प्रत्येक ब्लॉक आणि जिल्ह्यामधील खास उत्पादनांचा शोध घेतला पाहिजे. आत्मनिर्भर भारत पॅकेज अंतर्गत ज्या घोषणा करण्यात आल्या आहेत. त्या एका निश्चित कालमर्यादेमध्ये प्रत्यक्षात उतरवल्या गेल्या पाहिजेत. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने काम केले पाहिजे, असे मोदींनी सांगितले