कोची - चीनच्या वुहान शहरातून पसरलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यानंतर हळूहळू कोरोनाचा प्रार्दुभाव वाढत आहे. देशामध्ये महाराष्ट्रात कोरोनाचे सर्वाधिक रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या अधिक आहे. मात्र, देशातील सर्वच राज्यात कोरोनाचा प्रादुर्भाव असल्याचे दिसून येते. त्यामुळेच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी १४ एप्रिलपर्यंत देशात लॉकडाऊन असल्याची घोषणा केली आहे. लॉकडाऊनमुळे अनेकांना संकटाचा सामना करावा लागत आहे. सर्वसामान्य नागरिकांसह देशातील दिग्गज राजकीय नेत्यांनाही या परिस्थितीला कठीण प्रसंगातून सामोरे जावे लागत आहे. त्यामुळे, आता लॉकडाऊन नेमकं कधी संपणार, याचीच चर्चा रंगली आहे. पण, लॉकडाऊन कालावधी वाढविण्यात यावा, अशी मागणी अनेक राज्य सरकारकडून होत आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कॅबिनेट बैठक घेऊन लॉकडाऊनच्या वाढीसंदर्भात आणि कोरोनाच्या प्रादुर्भावातील देशातील परिस्तितीबाबत चर्चा केली. तसेच, सर्वच राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबतही मोदींनी लॉकडाऊन कालावधी आणि इतर उपाययोजना याबाबत संवाद साधला. देशातील बहुतांश राज्य सरकारने लॉकडाऊन कालावधी वाढण्याची सूचना केल्याची माहिती आहे. देशातील परिस्थिती पाहून टप्प्या-टप्प्याने लॉकडाऊन कमी करताना देशात ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याची सूचना केरळ राज्य सरकारने मांडली आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सर्वच राज्यांच्या राज्य सरकारला लॉकडाऊन संदर्भात सूचना देण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार, केरळ सरकारच्या उच्चस्तरीय समितीच्या सूचनेनुसार, विविध राज्यात कोरोना व्हायरसचे संक्रमण वेगवेगळ्या स्तरावर दिसून येत असल्याचे म्हटले आहे. तसेच, त्याआधारेच समितीने लॉकडाऊन संदर्भात प्रस्ताव सादर केला आहे. या समितीचे प्रमुख केरळचे माजी मुख्य सचिव आणि भारतीय सुरक्षा एक्सचेंज बोर्ड (सेबी) चे सदस्यही आहेत. या समितीने अनेक प्रकारे चाचपणी आणि संशोधन केले आहे. त्यामध्ये, आरोग्य, नागरिक, अर्थव्यवस्था आणि आरोग्य व्यवस्था याचा अभ्यास करण्यात आला आहे.
कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यात हवे तेवढ यश आले नसल्याने ३० जूनपर्यंत लॉकडाऊन ठेवण्याची सूचना या समितीने मांडली आहे. त्यांसंबधी काही नियम आणि अटीही या समितीने दिल्या आहेत.
घरातून बाहेर पडताना मास्क लावणे अनिवार्य असणार आहे. लग्नसोहळ्यासाठी स्थानिक प्रशासनाची परवानगी आवश्यक, पण लग्नाला २५ पेक्षा जास्त लोकं नसावेत. सर्वच कामकाज कार्यालय, खासगी गाड्या आणि परिवहन मंडळाच्या वाहतूकीमध्ये एसी बंद ठेवण्यात यावे. ५ पेक्षा अधिक कोरोना संक्रमित गाव, परिसर हा हॉटस्पॉट म्हणून घोषित करावा. तसेच, या संबंधित गावांमध्ये १०० पेक्षा अधिक लोकं संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेली असावीत,हॉटस्पॉट विभागांना पूर्णपणे बंद ठेवण्यात यावे, प्रशासनाने हा भाग सील करावा. आपात्कालीन परिस्थीत पोलीस आणि स्वयंसेवी संस्थांनी पुढाकार घेऊन मदतकार्य करावे. हॉटस्पॉट नसलेल्या भागात १५ एप्रिलनंतर तीन टप्प्यात लॉकडाऊन कमी करण्यात यावे. धार्मिक कार्यक्रम आणि आयोजित उपक्रमांना बंदी, अंत्यसंस्काराला १० पेक्षा अधिक नागरिक असू नयेत
केरळ उच्चस्तरीय समितीने या शिफारसींसह ३० जूनपर्यंत देशात लॉकडाऊन ठेवण्याची सूचना मांडली आहे, याबाबत बीसीसी हिंदीने वृत्त दिले आहे.