नवी दिल्लीः कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव वाढत चालल्यानं देशात संक्रमितांची संख्यासुद्धा वाढली आहे. केंद्रातल्या मोदी सरकारनंही २१ दिवसांचा लॉकडाऊन कालावधी वाढवून ३ मेपर्यंत केला आहे. त्यामुळे लोकांनी घरातच राहावं, घराबाहेर न पडता सामाजिक अंतर राखावं, असं आवाहनही केंद्राकडून जनतेला करण्यात येत आहे. विशेष म्हणजे केंद्र सरकार आणि इतर राज्य सरकारंही कोरोनाला थोपवण्यासाठी प्रयत्नशील आहेत.देशात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या १७ हजारांच्या पलीकडे गेली असली तरी सध्या १४१७५ रुग्ण अजूनही कोरोना संक्रमित आहेत. कोरोना संक्रमितांपैकी २३०२ लोक कोरोनापासून मुक्त झाले आहेत. तर कोरोनं मृत्यू झालेल्यांची संख्याही ५४३च्या वर गेली आहे. भारतात कोरोनाचा प्रभाव हळूहळू कमी कमी होत चालल्याचं चित्र समोर आलं असून, ७ गोष्टीमधून याचे संकेत मिळत आहेत. या ७ गोष्टी भारतासाठी दिलासा देणाऱ्या आहेत: -
- कोरोना विषाणूच्या आजारापासून मुक्त होणारी पहिली गोष्ट म्हणजे देशातील एकूण ७३६जिल्ह्यांपैकी ४११ जिल्हे असे आहेत ज्यात रविवारपर्यंत एकही कोरोनाचं प्रकरण समोर आलेलं नाही. याचा अर्थ असा आहे की. जवळपास अर्ध्या देशात कोरोनाचे एकही रुग्ण आज सापडलेला नाही.
- राजस्थानमधील भिलवाडामध्ये एकही प्रकरण आज समोर आलेलं नाही, ही दिलासा देणारी बाब आहे. सुरुवातीला भिलवाडा हा कोरोनाचा हॉटस्पॉट होते. भिलवाड्याला कोरोनापासून वाचवण्यासाठी प्रशासनाने वेगाने पावलं उचलली होती.. भिलवाड्या हद्दी बंद करण्यात आल्या होत्या, तसेच लॉकडाऊनचेही काटेकोरपणे पालन केले जात आहे. यासह प्रत्येक व्यक्तीची चाचणी घेण्यात येत असून, ट्रॅकिंगही करण्यात आले आहे. त्याचा परिणाम म्हणून भिलवाड्यात कोरोनाचे रुग्ण सापडणं जवळपास बंदच झालं आहे. भिलवाडा हा कोरोनापासून पूर्णपणे मुक्त झाला असून, कोणतेही नवीन प्रकरण समोर येत नाही.
- भिलवाड्याबरोबर गोवा हे राज्यसुद्धा कोरोनापासून मुक्त झालं आहे. राज्यात एकूण ७ प्रकरणे नोंदविण्यात आली होती, त्यापैकी ६ रुग्ण आधीच बरे झाले आहेत. रविवारी शेवटच्या रुग्णालाही रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे.
- लॉकडाऊनपूर्वी कोरोनाचे रुग्ण तीन दिवसांत दुप्पट सापडत होते. आता दुप्पट रुग्ण सापडण्यास जवळपास सरासरी 6.2 दिवस लागतात. काही राज्यांमध्ये कोरोनाचे रुग्ण सापडण्याचं प्रमाण कमी झालेलं आहे. या राज्यांमध्ये केरळ, आसाम, तामिळनाडू, पंजाब, यूपी, हरियाणा, लडाख, दिल्ली, चंदीगड इत्यादींचा समावेश आहे.
- इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्च (आयसीएमआर)ची कोरोना टेस्टिंग क्षमता प्रत्येक येणा-या दिवसागणिक वाढतच चालली आहे. सरकारनेही आपल्या योजनेची क्षमता दररोज सुमारे ८० हजारांपर्यंत वाढवावी लागेल, असं काही दिवसांपूर्वी सांगितलं होतं. जी सध्या दररोज 37 हजारांच्या जवळपास पोहोचली आहे.
- कोरोनासारख्या जागतिक संसर्गाच्या रोगाशी दोन हात करणाऱ्या केरळ राज्याचा गवगवा केला जातोय. कारण केरळमध्ये पॉझिटिव्ह रुग्णांच्या बरं होण्याचं प्रमाण ५६.३ टक्के असून, देशातील इतर राज्यांच्या तुलनेत ही बाब चांगली आहे.
- उत्तर प्रदेशातील बर्याच जिल्ह्यांमध्ये कोरोनाचा प्रभाव कमी होत चालला आहे. पिलिभीत, महाराजगंज आणि हाथरस हे कोरोनामुक्त जिल्ह्ये आहेत. तिथले सर्व रुग्ण पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.