नवी दिल्ली - कोरोना विषाणूच्या वाढत्या संसर्गामुळे देशातील कोरोनाबाधितांची संख्या वेगाने वाढत आहे. दरम्यान, जानेवारीच्या अखेरीस देशात कोरोनाचा पहिला रुग्ण सापडल्यापासून आतापर्यंत देशात कोरोनाच्या पन्नास लाखांहून अधिक चाचण्या झाल्या आहेत. जागतिक पातळीवर ही चौथ्या क्रमांकाची संख्या आहे. मात्र लोकसंख्येच्या तुलनेत चाचण्यांचा विचार केल्यास भारत खूप मागे आहे. १९ मे रोजी देशातील दरदिवशीच्या कोरोना चाचण्यांचा आकडा एक लाखांच्या पुढे पोहोचला होता. मात्र भारतात कोरोनाच्या चाचण्या घेण्याबाबत तीन गंभीर चुका होत आहेत. या चुका राज्यांकडून होत आहेत.
पहिली चूक - कमी होणाऱ्या चाचण्याभारतात काही राज्ये खूप कमी लोकांची कोरोना चाचणी घेत आहेत. याबाबतीत गुजरातचे उदाहरण देता येईल. कोरोनाच्या रुग्णसंख्येत चौथ्या स्थानी असूनही चाचण्यांच्या बाबतीत हे राज्य खालून पाचव्या क्रमांकावर आहे. गुजरातमध्ये दर दहा लाख लोकांमागे केवळ ८४ चाचण्या होत आहेत. अशा प्रकारांमुळे कोरोनाचे नवे रुग्ण शोधून काढण्याच्या प्रयत्नांना धक्का बसत आहे.
दुसरी चूक - रुग्णांच्या संख्येच्या तुलनेत कमी चाचण्या काही राज्यांमध्ये कोरोनाच्या रुग्णांच्या तुलनेत कमी चाचण्या केल्या जात आहेत. कोरोनाच्या टेस्टिंगमध्ये टेस्ट पॉझिटिव्हिटी आणि दररोज प्रति दहा लाख लोकसंख्येमागे केलेल्या चाचण्या महत्त्वाच्या मानल्या जातात. जास्त टीपीआर आणि कमी टेस्टिंगमुळे महाराष्ट्र व गुजरात अधिक अडचणीत आहेत. तर गोवा आणि जम्मू काश्मीर ही राज्ये दर दहा लाख लोकसंख्येमागे सर्वाधिक चाचण्या करत आहेत.
तिसरी चूक - काही राज्यांकडून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये होत नसलेली वाढ कोरोनाच्या चाचण्यांबाबत होत असलेली तिसरी चूक म्हणजे काही राज्यांकडून कोरोनाच्या चाचण्यांमध्ये होत नसलेली वाढ होय. मे महिन्याच्या मध्यावर काही राज्यात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत मोठी वाढ दिसून आली. दिल्ली, गुजरातसारखी राज्ये वाढत्या रुग्णसंख्येच्या तुलनेत टेस्ट वाढवत नाही आहेत. तर महाराष्ट्र आणि तामिळनाडूसारख्या राज्यांनी टेस्टिंग वाढवले आहे. महाराष्ट्र आणि तामिळनाडूत रोज सरासरी १४ हजार कोरोना चाचण्या होत आहेत. तर गुजरात आणि दिल्लीत सरासरी सहा हजार चाचण्या होत आहेत. त्यातही गुजरात हे दिल्लीपेक्षा मोठे राज्य असूनही तिथे जेमतेम दिल्लीएवढ्याच चाचण्या झाल्या आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या