नवी दिल्ली - वेगाने होत कोरोना विषाणूच्या फैलावाने देशासमोरील चिंता वाढवली आहे. काही राज्यात कोरोना कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत आहे. मात्र काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही तीन राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत.
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोवा आधीच कोरोनामुक्त झाले होते. आता अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. या तिन्ही राज्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडले होते. मात्र आता या राज्यातील कोरोनाच्या सर्व रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर येथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.
दरम्यान, देशात काही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. नागालँड आणि सिक्कीम या राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तसेच दमण दिव, दादरा आणि नगर हवेली, लक्षदीप या केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.
देशातील इतर राज्यांचा विचार केल्यास महाराष्ट्र, गुजरात, दिल्ली, मध्य प्रदेश, राजस्थान, तामिळनाडू आणि उत्तर प्रदेश या राज्यांत आतापर्यंत प्रत्येकी एक हजाराहून अधिक रुग्ण सापडले आहेत. पैकी सर्वाधिक कोरोनाबाधित हे महाराष्ट्रात आहेत. तसेच गेल्या 24 तासात कोरोनाचे नवे 24 रुग्ण सापडल्याने देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 21 हजारांवर पोहोचला आहे.