कोरोनाच्या दुसऱ्या लाटेच्या समाप्तीनंतर तिसऱ्या लाटेची चर्चा सुरू झाली होती. ही लाट ऑगस्टच्या सुरुवातीला येऊ शकते, असा अंदाज वर्तवला जात होता. आता केरळमध्ये कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होऊ लागल्याचे दिसून येत आहे. कोरोनाच्या तिसऱ्या लाटेला सुरुवात झाली, अशी दबक्या आवाजात चर्चाही सुरू झाली आहे.
लसीकरणाचे चित्र काय?केरळमध्ये आतापर्यंत ३५ टक्के लोकसंख्येला पहिला डोस तर १६ टक्के लोकसंख्येला दोन्ही डोस देऊन झाले आहे. देशात ८ टक्के लोकांचे संपूर्ण लसीकरण झाले आहे. देशाच्या मानाने केरळमध्ये लसीकरणाचा वेग चांगला आहे.
बाधितांचे प्रमाण का वाढले? जास्त चाचण्यांमुळे केरळमध्ये बाधित मोठ्या प्रमाणात आढळून येत आहेत, असा एक कयास आहे. काही तज्ज्ञांच्या मते बाधितांच्या संख्येत वाढ होण्याची अन्य काही कारणे आहेत काय, हेही पाहणे गरजेचे आहे. जनुकीय क्रमनिर्धारण चाचण्या जास्त झाल्या तर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंट्सचा पत्ता लागू शकतो, असेही तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
सरकार गाफील राहिले का? केरळमध्ये अलीकडेच स्थानिक स्वराज्य संस्थांच्या आणि नंतर विधानसभा निवडणुका झाल्या. या निवडणुकांमध्ये लोकांनी कोरोनानियमांचे उल्लंघन केले. सणावारांनाही लोक परस्परांकडे जाऊ लागले आणि कोरोनाबाधितांचा दर वाढू लागला. या सर्व काळात सरकार गाफील राहिले. बाधितांची संख्या वाढू लागताच केरळ सरकारने लॉकडाउन वाढविण्याचा निर्णय घेतला आहे.
केरळची स्थिती काय आहे?देशात बाधितांची संख्या ४३ हजार असताना त्यात केरळचा वाटा २२ हजार बाधितांचा आहे. २०६२४ बाधित रविवारी केरळमध्ये आढळले. सलग चौथ्या दिवशी बाधितांचा आकडा २० हजारांहून अधिक आहे. त्यात घट झालेली नाही.