नवी दिल्ली : देशात जीवघेण्या कोरोना व्हायरसच्या दुसऱ्या लाटेचा प्रादुर्भाव कमी होताना दिसत आहे. असे असले तरी कोरोनाची तिसरी लाटही (coronavirus third wave) देशात लवकरच येणार असल्याची चिंताजनक बातमी आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाकडून (SBI) जाहीर करण्यात आलेल्या रिपोर्टमध्ये याबाबतची माहिती देण्यात आली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, भारतात कोरोनाची तिसरी लाट पुढील महिन्यात येऊ शकते. (coronavirus third wave may start from next month in india says sbi report)
याचबरोबर, या रिपोर्टमध्ये सप्टेंबर महिन्यापर्यंत ही लाट शिगेला पोहोचण्याचा दावा करण्यात आला आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या रिसर्च रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, 7 मे रोजी भारतातील कोरोनाची दुसरी लाट शिगेला पोहोचली होती. "सध्याच्या आकडेवारीनुसार, भारतात जुलैच्या दुसर्या आठवड्यात जवळपास 10,000 कोरोनाची प्रकरणे पोहचू शकतात. मात्र, ऑगस्टच्या दुसर्या पंधरवड्यापर्यंत कोरोनाची प्रकरणे वाढू शकतात."
दुसऱ्या लाटेसारखी तिसरी लाट गंभीर असू शकतेरिपोर्टनुसार, जागतिक आकडेवारीवरून समजते की, दुसऱ्या लाटेच्या तुलनेत तिसऱ्या लाटेत जास्त लोकांना संसर्ग होईल. स्टेट बँक ऑफ इंडियाने प्रसिद्ध केलेल्या रिपोर्टनुसार, या लाटेचा परिणाम जवळपास 98 दिवस राहू शकतो. या व्यतिरिक्त तज्ज्ञांचे असे म्हणणे आहे की, तिसरी लाट दुसऱ्या लाटे इतकीच गंभीर असू शकते. मात्र, सरकारकडून राबविल्या जाणाऱ्या कोरोना लसीकरण मोहिमेचाही लोकांना फायदा होईल. या लाटेत मृतांचा आकडा दुसर्या लाटपेक्षा कमी असू शकतो. याचबरोबर, रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, विकसित देशांमध्ये दुसऱ्या लाटेचा कालावधी 108 दिवस आणि तिसर्या लाटेचा कालावधी 98 दिवसांचा आहे. यादरम्यान, कोरोनावर मात करण्यासाठी जर चांगली तयारी केली गेली तर मृत्यूचे प्रमाण कमी होऊ शकतो.
मुलांवर अधिक परिणाम होऊ शकतोया तिसऱ्या लाटेचा परिणाम मुलांवर अधिक दिसून येऊ शकतो. तसेच, यादरम्यान, सर्व लोकांचे प्राधान्य कोरोनावरील लस असले पाहिजे. देशात 12-18 वर्ष वयोगटातील 15-17 कोटी मुले आहेत. विकसित देशांप्रमाणेच या वयोगटातील लसी विकत घेण्यासाठी भारतानेही आगाऊ धोरण आखले पाहिजे, असे रिपोर्टमध्ये म्हटले आहे.
गेल्या 24 तासांत 39 हजार 796 रुग्णांची नोंददेशात गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 39 हजार 796 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तसेच 723 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. भारतात सलग सातव्या दिवशी 50 हजारांहून कमी कोरोना रुग्णांच्या दैनंदिन संख्येचे नोंद करण्यात आली आहे. तसेच कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या आकड्यातही घट झाली आहे. याचबरोबर, देशात गेल्या 24 तासांत 14 लाख 81 हजार 583 कोरोना प्रतिबंधक लसींचे डोस देण्यात आले आहेत. आयसीएमआरने दिलेल्या माहितीनुसार, भारतात रविवारी 15 लाख 22 हजार 504 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत. त्यानंतर आतापर्यंत एकूण 41 कोटी 97 लाख 77 हजार 457 सॅम्पल्स टेस्ट करण्यात आले आहेत.