कोलकाता: सध्या देशातील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आहे. एप्रिल-मेमध्ये कोरोनाची दुसरी लाट आली. मेच्या पहिल्या आठवड्यात देशात दररोज ४ लाखांहून अधिक रुग्ण सापडत होते. मात्र आता कोरोनाची लक्षणं बदलली आहेत. त्यामुळे कोरोना संक्रमण ओळखण्याचं आव्हान निर्माण झालं आहे. कोरोना चाचणी करून घेण्याचा सल्ला अनेक जण गांभीर्यानं घेत नाहीत, असा कोलकात्यामधील डॉक्टरांचा अनुभव आहे.
कोरोना प्रतिबंधात्मक लस घेतली आहे. त्यामुळे आता कोरोना होणारच नाही, असा अनेकांचा समज झाला आहे. आता कोरोनाची लक्षणं बदलली आहेत. ती सौम्य स्वरुपाची आहेत. मात्र उपचार न घेतल्यास परिस्थिती गंभीर होऊ शकते. 'अनेकजण आता कोरोना चाचणी करून घेण्यास रस दाखवत नाहीत. डॉक्टरांच्या सल्ल्यांकडे बरेचजण दुर्लक्ष करतात. कोरोना चाचण्यांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे कोरोना रुग्णांचे नेमके आकडे समोर येत नाहीत,' असं डॉक्टरांनी सांगितलं.
'नोव्हेंबर-डिसेंबर दरम्यान वातावरणात बदल होतो. त्यामुळे सर्दी, खोकल्याचा त्रास होतो. दर हिवाळ्यात असा त्रास होत असल्यानं लोक दुर्लक्ष करतात. अशाच प्रकारचा त्रास कुटुंबातील बऱ्याचशा सदस्यांना होत असल्यास ही कोरोनाची लक्षणं असू शकतात. अशा परिस्थितीत चाचणी करून घ्यायला हवी,' असं बालीगंजमधील डॉ. सब्यसाची वर्धन यांनी सांगितलं.
सर्दी, खोकला, फ्लू झालेले अनेकजण कोरोना चाचणीनंतर पॉझिटिव्ह आढळून आलं. यातील बहुतांश रुग्ण घरीच बरे झाले. तर काहींनी रुग्णालयात दाखल करावं लागलं. एका आठवड्यात अशा प्रकारचे ४० रुग्ण आढळले. सध्या कोरोना झालेल्या रुग्णांना ओला खोकला, कफ होणारा खोकला अशा स्वरुपाचे त्रास होत आहेत. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेवेळी कोरडा खोकल्याचा त्रास व्हायचा. आता ओल्या खोकल्यासोबत हलका ताप जाणवत आहे. दुसऱ्या लाटेदरम्यान कोरोना बाधितांना जास्त ताप यायचा.