नवी दिल्ली: कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात २१ दिवसांच्या लॉकडाऊनची घोषणा केली. आपल्या घरातच राहा, असं आवाहन मोदींनी देशवासीयांना केलं. मात्र लॉकडाऊनमुळे रोजागरच नसल्यानं कित्येक जण शहरांमधून गावांकडे जाण्याचा प्रयत्न करत आहेत. दिल्लीत आज बस स्टँडवर हजारोंनी गर्दी केली होती. रोजगार नसल्यानं पोट भरायचं कसं, या विवंचनेत असलेले वाहतूक पूर्णपणे ठप्प असतानाही त्यांच्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी पंतप्रधान मोदींनी २४ मार्चला लॉकडाऊनची घोषणा केली. लॉकडाऊनच्या २१ दिवसांमध्ये घराबाहेर पडू नका, असं आवाहन मोदींनी केलं. मात्र लॉकडाऊनच्या घोषणेमुळे उत्तर प्रदेश, बिहारमधून आलेल्या हजारो स्थलांतरितांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. हातावरचं पोट असल्यानं जगायचं कसं, असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण झाल्यानं ते त्यांच्या गावी जाण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे दिल्लीतल्या अनेक बस आगारांमध्ये आज हजारोंची गर्दी पाहायला मिळाली. उपजीविकेसाठी दिल्लीला आलेली हजारो कुटुंब उत्तर प्रदेशातल्या त्यांच्या गावांकडे परतण्याचा प्रयत्न करत आहेत. अशा हजारो कुटुंबांनी आज दिल्लीतल्या बस स्टँडवर गर्दी केली. गेल्या काही दिवसांपासून शहरातल्या अनेक स्टँडवर अशीच परिस्थिती पाहायला मिळत होती. अखेर आज दिल्ली आणि उत्तर प्रदेश सरकारनं त्यांच्यासाठी काही बसेसची सोय केली. उत्तर प्रदेश सरकारनं राज्यातील नागरिकांना परत आणण्यासाठी १ हजार बसेसची व्यवस्था केली. तर दिल्ली सरकारनं डीटीसीच्या २०० बसेस उपलब्ध करुन दिल्याची माहिती मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी दिली.