गुवाहाटी : आसाममधील नागाव जिल्ह्यामध्ये मुस्लिम धर्मगुरुच्या अंत्यसंस्कार विधीला सुमारे १० हजार लोकांनी हजेरी लावल्याने निर्बंधांचा बोजवारा उडाला. या प्रकारामुळे कोरोनचा संसर्ग आणखी फैलावण्याची शक्यता असल्याने आसाममधील तीन गावांमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.आॅल इंडिया जमियत उलेमा या संघटनेचे उपाध्यक्ष व आमीर-ए-शरियत असा किताब मिळालेले खैरुल इस्लाम (८७ वर्षे) यांच्या दफनविधीसाठी त्यांच्या नागाव या गावी गुरुवारी हजारो लोक जमले होते. जमावाने फिजिकल डिस्टन्सिंगचा नियम पाळला नाही. आपले वडील खैरुल इस्लाम यांच्या दफनविधीच्या वेळची काही छायाचित्रे आॅल इंडिया युनायटेड डेमोक्रॅटिक फ्रंटचे आमदार अमीनूल इस्लाम यांनी समाजमाध्यमामध्ये झळकविल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. ते नागावमधील धिंग मतदारसंघाचे आमदार आहेत. यासंदर्भात पोलिसांनी दोन गुन्हे दाखल केले आहेत अशी माहिती नागावचे पोलीस उपायुक्त जदाव सैकिया यांनी दिली आहे. नागाव व अन्य दोन गावांमध्ये शनिवारपासून लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. सैकिया यांनी सांगितले की, या दफनविधीला उपस्थित राहिलेल्या अनेक लोकांनी मास्क घातले नव्हते. फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन केले नाही. साथीचे आजार रोखण्यासाठी केलेल्या कायद्यांचे उल्लंघन या लोकांनीकेले आहे.वादग्रस्त आमदाराकडून सारवासारवयासंदर्भात आमदार अमीनूल इस्लाम यांनी सांगितले की, माझे वडील खैरुल इस्लाम हे अतिशय ख्यातनाम व्यक्ती होते व त्यांच्या अनुयायांची संख्याही मोठी आहे. त्यांचे निधन झाल्यावर तत्काळ प्रशासनाला कळविण्यात आले. कोरोना साथीमुळे अत्यंत कमी लोकांच्या उपस्थितीत खैरुल इस्लाम यांच्या दफनविधीची व्यवस्था करावी असेही आम्ही सांगितले होते. आमदार अमीनूल इस्लाम यांनी भडक वक्तव्ये केल्याच्या आरोपावरून त्यांना एप्रिलमध्ये अटक करण्यात आली होती. त्यांनी सोशल मिडियावरही आपले भाषण झळकविले होते.
coronavirus:आसाममध्ये दफनविधीसाठी जमला हजारोंचा जमाव, पोलिसांकडून गुन्हा दाखल
By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2020 5:10 AM