पाटणा - कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरात करण्यात आलेल्या लॉकडाऊनचा सर्वाधिक फटका गरिब आणि मजूर वर्गाला बसला आहे. लॉकडाऊननंतर अनेकांनी आपल्याकडील कामगारवर्गाला कमी केल, तसेच घरगुती काम करणाऱ्यांना मजूरांनाही घरी बसविण्यात आले आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आवाहन करुनही या मजूर वर्गाला त्यांच्या मालकांकडून वेतन मिळाले नाही. तसेच, या स्थलांतरीत मजूरांच्या निवासाची सोयही करण्यात आली नाही. बिहारच्या भागलपूर येथील अशीच एक घटना समोर आली आहे. खंजरपूर येथील तीन बहिणी गेल्या तीन दिवसांपासून उपाशीपोटी झोपत आहेत. या बहिणींनी अखेर पंतप्रधान कार्यालयास फोन करुन आपली व्यथा सांगितली.
पंतप्रधान कार्यालयाकडे या पीडित मुलींनी विनंती केल्यानंतर भागलपूर येथील प्रशासनाने तात्काळ संबंधित ठिकाणी जाऊन या तिन्ही बहिणींच्या जेवणाची सोय केली. बडी खंजरपूर येथील विषहरी परिसरात गौरी कुमारी, आशा कुमारी आणि कुमकुम या तीन बहिणी राहत आहेत. त्यांच्या माता-पित्याचे निधन झाल्याने त्या तिघीच एमकेकींचा सहारा आहेत. त्यांना आणखी एक लहान बहिण असून ती सध्या मावशीकडे राहते. तर, या तिन्ही बहिणी दुसऱ्याच्या घरात मोलमजुरी करुन आपलं सन्मानाने जीवन जगतात. मात्र, लॉकडाऊनमुळे त्यांचे काम गेले असून सध्या त्या घरीच राहतात. तर, घरात पुढील १४ दिवस पुरेल एवढे अन्नही नाही. त्यामुळे, त्यांनी पंतप्रधान कार्यालयास फोन करुन गेल्या ३ दिवसांपासून उपाशी असल्याची व्यथा मांडली. त्यानंतर, प्रशासनाने तात्काळ मदत पाठवली.
जगदीशपूरचे सीओ सोनू भगत यांनी याबाबत माहिती दिली, पंतप्रधान कार्यालयातून बिहार आपत्ती व्यवस्थापन कार्यालयात, या तिन्ही मुलींनी तात्काळ मदत करण्याचे आदेश देण्यात आले होते. त्यानंतर, आपत्ती व्यवस्थापन विभागातील अधिकाऱ्यांना तात्काळ तेथे जाऊन तिन्ही मुलींच्या जेवणाची सोय केली. तसेच, त्यांची वैद्यकीय तपासणी केली असता, तिघींचीही प्रकृती उत्तम असल्याचं त्यांनी सांगितलं. प्रशासना या तिन्ही मुलींची काळजी घेत असल्याचंही त्यांनी सांगितलं.
दरम्यान, संपूर्ण जगात हाहाकार माजवलेल्या कोरोना व्हायरसने भारतात शिरकाव केल्यापासून अनेक लोक याचे शिकार होत आहेत. गेल्या काही दिवसात कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार आतापर्यंत भारतात २ हजार ५५३ कोरोनाबाधित रुग्ण आहेत. तर ७२ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.