नवी दिल्ली : चीननंतर इटलीमध्येकोरोनाचा कहर काढू लागला असून तिथे 400 हून जास्त नागरिक संक्रमित झाले आहेत. तर उद्रेक रोखण्यासाठी अनेकांना घरातच राहण्याचे सांगण्यात आले आहे. भारतातही कोरोनाने संक्रमित रुग्णांची संख्या वाढू लागली असून केरळमध्ये एका तीन वर्षांच्या बालकालाही लागण झाल्याचे समोर आले आहे.
एकट्या काश्मीरमध्ये 400 जणांना कोरोनाचे संशयित रुग्ण म्हणून निरिक्षणाखाली ठेवण्यात आले आहे. तर या भागातील अंगणवाड्याही 31 मार्च पर्यंत बंद करण्यात आल्या आहेत. केरळमध्ये होळीमुळे कोरोना व्हायरस पसरण्याची भीती लक्षात घेऊन पथमानथिट्टा जिल्हाधिकाऱ्यांनी 3 दिवसांची सुट्टी जाहीर करून टाकली आहे. केवळ 10 वीच्या परीक्षा घेण्यात येणार आहे. केरळमध्ये पाच नवीन कोरोना संक्रमित रुग्ण आढळले आहेत.
केरळच्या एर्नाकुलम येथे सोमवारी एका 3 वर्षाच्या मुलालाही कोरोना विषाणूची लागण झाल्याच समोर आले आहे. या मुलाचे कुटुंबीय नुकतेच इटलीहून परतले होते. या बालकाला एर्नाकुलम मेडिकल कॉलेजच्या विशेष वॉर्डमध्ये ठेवण्यात आले आहे. केरळमध्ये आतापर्यंत ९ जण संक्रमित आहेत.
पाच पैकी तीन जण एका आठवड्यापूर्वी इटलीहून परतले होते. विमानतळावर तपासणीवेळी पती, पत्नी आणि त्यांचा 24 वर्षाचा मुलगा निगेटिव्ह आढळले होते. मात्र, घरी गेल्यानंतर कोरोनाची लागण झाल्याचे समजले. यानंतर त्यांच्या संपर्कात आलेल्या दोन नातेवाईकांनाही संसर्ग झाल्याचे आढळले आहे. सर्वांना जिल्हा रुग्णालयात ठेवण्यात आले आहे, तेथे त्यांची प्रकृती स्थिर आहे.