हैदराबाद - कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि लॉकडाऊनमुळे देशाच्या अर्थव्यवस्थेचे प्रचंड नुकसान होत आहे. उद्योगधंदे, आर्थिक व्यवहार ठप्प झाल्याने वेतन आणि रोजगाराचा गंभीर प्रश्न निर्माण झाला आहे. याचा फटका गोरगरीब मजूर आणि कामगारांसोबतच अनेक उच्चशिक्षित आणि मोठ्या पदांवर कार्यरत असलेल्या व्यक्तींनाही बसत आहे. त्यामुळे काही दिवसांपूर्वी चांगला पगार घेणारे शिक्षण आणि आयटी प्रोफेशनल्स व्यक्तींवरही उदरनिर्वाह मनरेगाच्या कामावर जाण्याची वेळ आल्याचे समोर आले आहे.
तेलंगणामधील एका उच्चशिक्षित पती-पत्नीला लॉकडाऊनमुळे दैनंदिन खर्च भागवण्यासाठी मनरेगा रोजगार हमी योजनेच्या कामावर कामगार म्हणून जावे लागत आहे. चिरंजिवी आणि पद्मा असे या पती-पत्नीचे नाव असून, हे दोघेही काही दिवसांपूर्वीपर्यंत शिक्षक म्हणून काम करत होते. चिरंजिवी याने पोस्ट ग्रॅज्युएशनसोबत बीएडची पदवी घेतली आहे. तर पद्मा यांनी एमबीए केले आहे. मात्र या शिक्षक पती-पत्नीला गेल्या दोन महिन्यांपासून वेतन मिळालेले नाही. त्यामुळे घरखर्च भागवण्यासाठी त्यांना मनरेगामध्ये मजुरी करावी लागत आहे.
आपल्यावर आलेल्या या परिस्थितीबाबत चिरंजिवी सांगतात की, ‘’मनरेगाच्या योजनेतून मिळणाऱ्या रोजंदारीतून आम्ही किमान कुटुंबासाठी भाजीपाला तरी खरेदी करू शकतो. आमच्या घरात दोन मुले आणि आई-वडिलांसह एकूण सहा माणसं आहेत. पगाराविना आमचा उदरनिर्वाह कसा चालेल.’’ कोरोना आणि लॉकडाऊनमुळे देशातील सुमारे दोन लाख शिक्षकांना गेल्या दोन तीन महिन्यांपासून पगार मिळालेला नाही.
केवळ शिक्षकच नव्हे तर आयटी कंपन्यांमध्ये लाखोंनी पगार घेणाऱ्यांचीही स्थिती काहीशी अशीच आहे. स्वप्ना ही तरुणी अशा आयटी प्रोफेशनल्सचे प्रातिनिधिक उदाहरण म्हणता येईल. ती काही दिवसांपूर्वी दरमहा एक लाख रुपये पगार घेत होती. मात्र आज तिला खर्च भागवण्यासाठी मजुरी करावी लागत आहे. ती सांगते, मी माझ्याकडे असलेल्या बचतीमधून माझा खर्च भागवू शकले असते. मात्र असा साठवलेला पैसा किती दिवस पुरला असता. आज संपूर्ण जगाचे भवितव्य अनिश्चित आहे, अशा परिस्थितीत मला माझ्याकडील बचत आपातकालीन परिस्थितीतीसाठी जपून ठेवायची आहे. त्यामुळेच माझ्या सासरची मंडळी जेव्हा कामाला जातात. तेव्हा मीसुद्धा त्यांच्यासोबत जाते. सॉफ्टवेअर इंजिनियर असल्याने मी असे काम करू नये असे कुणी सांगितलंय, जिवंत राहण्यासाठी काहीही करण्यास तयार राहिले पाहिजे.