नवी दिल्ली - कोरोनाच्या प्रचंड वेगाने होत असलेल्या फैलावामुळे सध्या देशावर गंभीर संकट आले आहे. एकीकडे शासन आणि प्रशासनाकडून कोरोनाला रोखण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न सुरू असले तरी दररोज नव्या बाधित रुग्णांचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. दरम्यान, सोमवारी देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा एकदा मोठी वाढ झाली असून, दिवसभरात तब्बल ५८७ जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला. त्यामुळे देशात कोरोनामुळे झालेल्या मृत्यूंच्या संख्येने २८ हजारांचा आकडा ओलांडला आहे.
केंद्रीय आरोग्यमंत्र्यालयाने दिलेल्या आकडेवारीनुसार सोमवारी देशभरात कोरोनाचे ३७ हजार १४८ नवे रुग्ण सापडले. त्यामुळे देशातील एकूण कोरोना रुग्णांचा आकडा वाढून ११ लाख ५५ हजार १९१ वर पोहोचला आहे. तर दिवसभरात ५८७ जणांचा मृत्यू झाला असून, देशात आतापर्यंत कोरोनामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या २८ हजार ८४ झाली आहे. सद्यस्थिती देशभरात कोरोनाचे ४ लाख २ हजार ५२९ अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ७ लाख २४ हजार ५७८ जणांनी कोरोनावर मात केली आहे.
एकीकडे देशात कोरोनाच्या रुग्णांची संख्या वेगाने वाढत असताना एम्सचे संचालक रणदीप गुलेरिया यांनी भारतातील कोरोनाच्या सध्याच्या स्थितीबाबत महत्त्वपूर्ण माहिती दिली आहे. देशातील कोरोनाच्या सद्यस्थितीबाबत भाष्य करताना रणदीप गुलेरिया म्हणाले की, देशातील काही भागात कोरोनाने आपलं सर्वोच्च शिखर गाठले आहे असे सध्याच्या परिस्थितीवरून आपण म्हणू शकतो. मुंबई आणि अहमदाबादमध्ये कोरोनाची सर्वोच्च पातळी येऊन गेल्याची शक्यता आहे. दिल्ली, मध्य मुंबई आणि अहमदाबाद या शहरांमध्ये कोरोनाने सर्वोच्च शिखर गाठल्यानंतर येथील साथीचा आलेख आता काहीसा खाली येऊ लागला आहे. तसेच देशातील इतर भागातही कोरोनाने सर्वोच्च पातळी गाठून झाली असण्याची शक्यता आहे. तर काही राज्यांमध्ये आताच कोरोनाची रुग्णसंख्या वाढत आहेत, अशा राज्यांमध्ये कोरोनाचा सर्वोच्च स्तर काहीसा उशिरा येण्याची शक्यता आहे.
दरम्यान, इतर देशांच्या तुलनेत भारतासोबतच मध्य आशियाई देशांमध्ये कोरोनामुळे होणाऱ्या मृत्यूंचे प्रमाण कमी आहे. कोरोनामुळे जे इटली आणि स्पेनमध्ये घडले, तसेच जे अमेरिकेत घडत आहे, ते भारतात घडलेले नाही, असेही गुलेरिया यांनी सांगितले. भारतीयांमध्ये कोरोनाशी लढण्याची प्रतिकारशक्ती आपोआप तयार झाली असावी, ज्यामुळे कोरोनामुळे होणारा मृत्यूदर भारतात कमी झाला असावा, अशी शक्यता त्यांनी वर्तवली.
इतर महत्त्वाच्या बातम्या
कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी
coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल
भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा
महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही
…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान
coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी