कोरोनाचा सामना करण्यासाठी देश सज्ज झाला असून खबरदारीचे सर्व उपाय करण्यात येत आहेत. देशातील कोरोनाग्रस्तांचा आकडा दिवसेंदिवस वाढत असून रुग्णांची संख्या 21 हजारांहून अधिक झाली आहे. तर तब्बल 681 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र याच दरम्यान काही दिलासादायक घटना समोर येत आहेत. देशात कोरोनाबाधितांचा आकडा सातत्याने वाढत असताना काही राज्यांनी कोरोनाविरोधातील लढाई जिंकण्यात यश मिळवले आहे. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही तीन राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. त्यानंतर आता आणखी एक राज्य कोरोनामुक्त झालं आहे. त्रिपुरा हे राज्य कोरोनामुक्त झाल्याची घोषणा त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी केली आहे.
त्रिपुरामध्ये कोरोनाचे दोन रुग्ण आढळून आले होते. या दोन्ही रुग्णांना उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र आता या दोघांच्या कोरोना चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने त्रिपुरा हे राज्य आता कोरोनामुक्त झाल्याची माहिती मिळत आहे. त्रिपुराचे मुख्यमंत्री बिप्लब देब यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून ही आनंदाची माहिती शेअर केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांचे रिपोर्ट निगेटिव्ह आल्याने राज्य कोरोनामुक्त झाल्याचं त्यांनी म्हटलं आहे. तसेच त्यांनी नागरिकांना घरी राहा आणि सुरक्षित राहा असा सल्ला देत सरकारच्या सूचना आणि सोशल डिस्टंसिंग पाळण्याचं आवाहन केलं आहे
पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेले गोवा आधीच कोरोनामुक्त झाले होते. आता अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर ही राज्ये कोरोनामुक्त झाली आहेत. गोवा, अरुणाचल प्रदेश आणि मणिपूर या तिन्ही राज्यात कोरोनाचे काही रुग्ण सापडले होते. मात्र आता या राज्यातील कोरोनाच्या सर्व रुग्णांना बरे झाल्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला आहे. त्यानंतर येथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. दरम्यान, देशात काही अशी राज्ये आणि केंद्रशासित प्रदेश आहेत जिथे कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. नागालँड आणि सिक्कीम या राज्यात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही. तसेच दमण दिव, दादरा आणि नगर हवेली, लक्षदीप या केंद्रशासित प्रदेशात कोरोनाचा एकही रुग्ण सापडलेला नाही.
कोरोनासाठी संशयितांची चाचणी करण्याचे भारताचे धोरण (स्ट्रॅटेजी) योग्य ठरल्याचे आकडेवारीवरून दिसत आहे. 23 मार्चला 14,594 जणांचे नमुने तपासले असता रुग्णसंख्या 400 वर पोहोचली, तर 22 एप्रिलपर्यंत 5 लाख नमुने तपासल्यानंतर 22 हजार रुग्ण आढळले. इतर देशांच्या तुलनेत भारतात 5 लाख चाचण्यांमागे पॉझिटिव्ह रुग्ण आढळल्याचे प्रमाण 4.5 टक्के आहे. अमेरिकेत 26 मार्चला 5 लाख चाचण्यांनंतर 80 हजार रुग्ण सापडले होते. यावरून जगाच्या तुलनेत भारताचे धोरण आतापर्यंत प्रभावी ठरल्याचा दावा पर्यावरण सचिव व एमपॉवर्ड ग्रुप-२ चे अध्यक्ष सी. के. मिश्रा यांनी केला आहे. लॉकडाऊनच्या तीस दिवसांमध्ये आपण रुग्णांपर्यंत पोहोचलो. कोरोना प्रसाराची साखळी रोखू शकलो. जगभरापेक्षा भारतात कोरोना प्रसाराचा वेग बऱ्यापैकी नियंत्रणात असल्याचेही ते म्हणाले.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : धक्कादायक! एकाच ATMमध्ये गेलेल्या 3 जवानांना कोरोनाची लागण
Coronavirus : अमेरिकेत कोरोनाचे थैमान! कोरोनाग्रस्तांचा आकडा 8 लाखांवर, 49,845 जणांचा मृत्यू
CoronaVirus: अन्य देशांच्या तुलनेत भारताची स्थिती चांगली; प्रसाराचा वेग स्थिर
CoronaVirus: मेच्या मध्यात देशातील मृतांचा आकडा ३८ हजारांवर जाणार?