नवी दिल्ली - दोन आठवड्यांपूर्वी दिल्लीतील निजामुद्दीन भागातील ‘आलमी मरकज’ या तबलिगी जमात’च्या मुख्यालयात झालेल्या धार्मिक संमेलनात सहभागी होऊन घरी परत गेलेल्या किमान ३७९ व्यक्तींना कोरोनाची लागण झाल्याची माहिती विविध राज्यांकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयास कळविण्यात आली आहे. राज्यांकडून केंद्राला कळविण्यात आलेल्या माहितीनुसार गुरुवार सकाळपर्यंत या सम्मेलनाशी संबंधित किमान १९ जणांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे. त्यापैकी नऊ तेलगंममधील ,महाराष्ट्र, दिल्ली व जम्मू-काश्मीरमधील प्रत्येकी दोन तर आंध्र प्रदेश, गुजरात, कर्नाटक व बिहारमधील प्रत्येकी एक मृत्यू तब्लिगशी संबंधित आहे. आता, या कार्यक्रमाला हजेरी लावलेले आणि देशभरात विखुरलेले काही जण पोलीस आणि डॉक्टर-नर्सेसना त्रास देत असल्याचे प्रकार समोर येत आहेत. त्या पार्श्वभूमीवर सरकारकडून आता सैन्य दलाला पाचारण करण्यात आल्याची माहिती आहे.
नवभारत टाईम्सने सूत्रांच्या हवाल्याने वृत्त दिले की, नरेला आयसोलेशन कॅम्पमध्ये वैद्यकीय मदतीसाठी विनंती अर्ज करण्यात आला होता. त्यानंतर, भारतीय सैन्य दलाने दोन डॉक्टर आणि दोन सहायक असे ४ जणांचे पथक नरेली येथे पाठवले आहे. या पथकासोबतच त्यांच्या सुरक्षिततेसाठी एक लहान संरक्षण पथकही पाठविण्यात आले आहे, हे पथक शस्त्रसज्ज असल्याचे समजते. दिल्लीतील निजामुद्दीन परिसरातील मरकज येथील कार्यक्रमात सहभागी झालेल्या तबलिगी जमातच्या लोकांना नरेलासह इतर काही रुग्णालयात आयसोलेशन कॅम्पमध्ये ठेवण्यात आले आहे. या आयसोलेट केलेल्या नागरिकांच्या अनेक तक्रारी वैद्यकीय स्टाफ आणि पोलीस प्रशासनाकडे येत आहेत. त्याच, पार्श्वभूमीवर नरेला येथील विलगिकरण कक्षात भारतीय सैन्य दलाची एक पथक आल्याची माहिती आहे.
दरम्यान, मध्य प्रदेशमधील इंदुर येथे गुरुवारी आरोग्य तपासणीसाठी आणि माहिती घेण्यासाठी आलेल्या वैद्यकीय स्टाफ आणि डॉक्टरांवर जमावाने हल्ला केला. देशभरातून या हल्ल्याचा निषेध व्यक्त करण्यात आला. तर, हैदराबादमधील एका रुग्णालयात तबलिगी जमातच्या कार्यक्रमाला हजेरी लावलेल्या मुस्लीम बांधवाना क्वारंटाईन करण्यात आले होते. मात्र, चक्क रुग्णायातही ते पुन्हा नमाज अदा करण्यासाठी एकत्र आल्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले. त्यानंतर, गाझियाबाद येथील धक्कादायक प्रकारही समोर आला आहे. येथील एका रुग्णालयात दाखल केलेले तबलिगी जमातचे संभाव्य कोरोनाग्रस्त लोकं येथील स्टाफसोबत गैरकृत्य करत आहेत. रुग्णालयातील नर्सेस समोरच हे लोक स्वत:चे कपडे उतरत असल्याचे समोर आले आहे. याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कोरोनाविरुद्धच्या लढाईत एकीकडे पोलीस प्रशासन आणि वैद्यकीय स्टाफ जीवाचं रान करुन काम करताना दिसत आहे. मात्र, दुसरीकडे त्यांच्यावर हल्ले करण्यात येत असल्याच्या निंदनीय घटना घडत आहेत. गाझियाबाद येथील एमएमजी रुग्णालयात दाखल करण्यात आलेले तबलिगी जमातचे लोक येथील वैद्यकीय स्टाफसोबत गैरव्यवहार करत आहे. त्यामुळेच, त्यांना तुरुंगात दाखल करण्याचा विचार जिल्हा प्रशासनन करत आहे. तर, आता नरेला येथील रुग्णालयात सैन्य दलाची छोटी तुकडीही हजर झाली आहे.