- नितीन अग्रवालनवी दिल्ली : कोरोना आजारातून बरे झाल्यानंतरही १२ आठवड्यांपर्यंत किंवा त्याहून अधिक काळ त्या आजाराचे दुष्परिणाम जाणवू शकतात, असे ‘एम्स’चे संचालक डॉ. रणदीप गुलेरिया यांनी म्हटले आहे. कोरोनातून बरे झाल्यानंतर तब्येतीची नीट काळजी घेण्याकडेही रुग्णांनी लक्ष दिले पाहिजे, असेही ते म्हणाले.गुलेरिया यांनी सांगितले की, कोरोनातून बरे झाल्यानंतरही त्याची काही लक्षणे बराच काळ मागे उरतात. अनेकांना श्वास घेण्यात अडचणी येतात. काहींच्या फुप्फुसात दोष निर्माण होतो. बरे झाल्यानंतरही त्या व्यक्तींना अनेक आठवडे खोकला, सर्दीचा त्रास सहन करावा लागतो. कोरोनातून बरे झालेल्या रुग्णांना सतत थकवा जाणवतो किंवा सांधेदुखी सुरू होते. कोरोनाचा संसर्ग जसा कमी होईल तसे कोरोनातून बरे झालेल्यांची संख्या वाढत जाईल. त्या लोकांच्या प्रकृतीची काळजी घेण्याचे नवे आव्हान आरोग्य यंत्रणेसमोर उभे राहील. गावांमध्ये कोनारोला रोखण्यासाठी डॉक्टरांना प्रशिक्षण देण्यात येत आहे.डॉ. रणदीप गुलेरिया म्हणाले की, कोरोनाच्या दोन लाटांमध्ये लहान मुलांना फार झळ पोहोचली नव्हती. मुलांना कोरोना झाला तरी त्याची लक्षणे खूप कमी असतात. तिसऱ्या लाटेत मुलांना संसर्गाचा धोका आहे, असे सांगितले जात आहे. मात्र हा संसर्ग कमी की जास्त प्रमाणात होईल, हे आताच सांगता येणार नाही.नव्या कोरोना रुग्णांत घट केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सहसचिव लव अग्रवाल यांनी सांगितले की, ७ मे रोजी देशात एकाच दिवसात सर्वाधिक ४.१४ लाख नवे कोरोना रुग्ण सापडले होते. मात्र त्यात नंतर घट झाली. गेल्या चोवीस तासात कोरोनाचे २.२२ लाख नवे रुग्ण आढळले. गेल्या चाळीस दिवसांतील हा नीचांक आहे. दर दिवशी कोरोनाचे १०० रुग्ण आढळतात, अशा जिल्ह्यांची संख्या ४ मे रोजी ५३१ होती. ती आता ४३१ पर्यंत खाली घसरली आहे.
बरे होणाऱ्यांची संख्या अधिकनव्या रुग्णांच्या संख्येत घट होण्याबरोबरच बरे होणाऱ्या रुग्णांची संख्याही वाढत आहे. कोरोनातून बरे होणाऱ्यांचे प्रमाण ३ मे रोजी ८१.७ टक्के होते. गेल्या ११ दिवसात बरे होणाऱ्यांची संख्या नव्या रुग्णांपेक्षा अधिक आहे. २७ राज्यांत सध्या ही स्थिती आहे.