नवी दिल्ली: देशातील कोरोनाची (CoronaVirus) परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत चालली आहे. गेल्या सलग काही दिवसांपासून देशातील नव्या कोरोनाबाधितांची संख्या २ लाखांच्या पार गेली आहे. देशातील कोरोना मृत्यूचेही प्रमाण वाढताना दिसत आहे. तर दुसरीकडे, रेमडेसिवीर इंजेक्शन, ऑक्सिजन, बेड्स अपुऱ्या पडत असताना कोरोना लसीचा तुडवडा जाणवत आहे. देशातील अनेक भागांत कडक लॉकडाऊन पुन्हा लावण्याची स्थिती निर्माण झाली आहे. अशातच देशातील कोरोना परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जोर धरू लागली आहे. (coronavirus twitter users demands pm narendra modi should resign)
कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधाननरेंद्र मोदी यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी ट्विटर युझर्सनी सोमवारी केली. ट्विटरवर २ लाख युझर्सनी हॅशटॅगचा वापर करत पंतप्रधान मोदींनी राजीनामा द्यावा, अशी मागणी लावून धरली. तर, काही युझर्सनी पंतप्रधान मोदींची तुलना 'निरो'शी केली.
“कोरोनाच्या काळात पंतप्रधान मोदी १८-१९ तास काम करतायत, राजकारण करू नका”
#ResignModi चा वापर
ट्विटर युझर्सनी #ResignModi या हॅशटॅगचा वापर करत सदर मागणी केली. यामध्ये काँग्रेस, तृणमूल काँग्रेस, डीएमके आणि डाव्या पक्षांच्या अधिकृत ट्विटर हँडलचाही समावेश असल्याचे पाहायला मिळाले. सर्व भारत कोरोनाशी लढत असताना, भाजप मात्र पश्चिम बंगालमधील विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी लढत आहे, असा आरोपही अनेकांनी केला. याशिवाय विविध प्रकारचे फोटो, कार्टून, व्हिडिओ ट्विटरवर हॅशटॅग वापरून शेअर केले.
तेजप्रताप यादव यांची पंतप्रधान मोदींवर टीका
बिहारचे माजी आरोग्यमंत्री आणि राजद नेते तेजप्रताप यादव यांनीही यामध्ये सहभागी होत पंतप्रधान मोदींवर निशाणा साधला. जेव्हा रोम जळत होते, तेव्हा 'निरो' बासरी वाजवत होता, अशी टीका यादव यांनी केली आहे. देशातील जनतेचे संरक्षण करू शकत नसाल, तर अशा पंतप्रधानाची देशाला गरज काय, अशी विचारणा काँग्रेस नेते असलम बाशा यांनी केली असून, पंतप्रधान मोदींनी जमिनीवर येऊन काम करावे, अशी मागणी केली आहे.
कुंभमेळा असो वा रमजान, कोरोना नियमांचे पालन अशक्य: अमित शाह
दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी पश्चिम बंगालच्या निवडणूक दौऱ्यावरून परतल्यानंतरही दिवसातील १८ ते १९ तास काम करत आहेत. केंद्र सरकार कोरोनाविरुद्ध लढाईत कोणताही भेदभाव न करता लढत आहे. जेव्हा एखादा राजकीय पक्ष आणि काही जण या विषयाला राजकीय रंग देऊ पाहतात ते पाहून फार वाईट वाटते, असे केंद्रीयमंत्री पियुष गोयल यांनी म्हटले आहे.