भुवनेश्वर - कोरोना विषाणूच्या फैलावाने सध्या जगासमोर गंभीर संकट उभे केले आहे. भारतातही वाढत्या कोरोनाबाधितांमुळे परिस्थिती चिंताजनक बनलेली आहे. मात्र अशा परिस्थितीत डॉक्टर आणि पोलीस हे कोरोना वॉरियर्स आघाडीवर राहून या संकटाचा सामना करत आहेत. प्रसंगी ही मंडळी आपल्या वैयक्तिक, कौटुंबिक जीवनातील सुख-दु:खे बाजूला ठेवून कोरोनाविरोधातील लढाईत आपले योगदान देत आहेत. अशीच एक डोळ्याच्या कडा ओलावणारी घटना ओदिशामधून समोर आली आहे. येथे होमगार्ड म्हणून काम करणारी महिला आपल्या मुलीच्या मृत्यूनंतर अवघ्या दोन दिवसांतच कर्तव्यावर हजर झाली. कोरोना स्पेशल ड्युटी लागलेली असल्याने या महिलेने वैयक्तिक दु:ख बाजूला ठेवून हा निर्णय घेतला.
गौरी बहरा असे या महिलेचे नाव आहे. तिची १३ वर्षांची मुलगी कर्करोगाने पीडित होती. दरम्यान, ड्युटीवर असतानाच त्यांना आपल्या मुलीची तब्येत बिघडली असल्याचे समजले. त्यानंतर त्यांनी सायकलवरून लगबगीने आपले घर गाठले. घरी जाऊन पाहते तर तिची मुलगी हे जग सोडून निघून गेली होती. ‘त्यावेळी माझे जगच उद् ध्वस्त झाल्याची भावना माझ्या मनात आली,’ असे गौरी यांनी सांगितले.
दरम्यान,गौरी यांनी जड अंतकरणाने आपल्या मुलीवर अंत्यसंस्कार करवून घेतले. त्यानंतर अवघ्या दोन दिवसांतच त्या आपल्या कर्तव्यावर हजर झाल्या. दरम्यान, दु:खद प्रसंगातही त्यांनी उचललेल्या या खंबीर पावलाचे ओदिशाच्या मुख्यमंत्री कार्यालयानेही कौतुक केले आहे. तर या कठीण काळात आम्ही त्यांच्यासोबत आहोत. हे काम करून त्यांनी एक उत्तम उदाहरण आमच्यासमोर ठेवले आहे, असे त्या क्षेत्राचे एसपी उमाशंकर दास यांनी सांगितले.