सतना - कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जाहीर केलेला २१ दिवसांचा लॉकडाऊन १४ एप्रिल रोजी संपेल. त्यामुळे १५ एप्रिलपासून नेमकं काय होणार, लॉकडाऊनमुळे लादण्यात आलेले निर्बंध हटवले जाणार का, लॉकडाऊन पूर्णपणे हटवला जाणार की टप्प्याटप्प्यानं निर्बंध मागे घेतले जाणार, असे अनेक प्रश्न सध्या देशवासीयांना पडले आहेत. मात्र, अद्यापही लॉकडाऊनच उल्लंघन प्रकार उघडकीस येत आहेत. आता, चक्क आमदाराकडून लॉकडाऊनच उल्लंघन झाल्याची घटना पुढे आली असून या आमदाराविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष म्हणजे लॉकडाऊन काळात हे महाशय चक्क आंदोलन करत होते.
मध्य प्रदेशच्या सतना जिल्ह्यातील कोलगवां पोलिसाांनी लॉकडाऊन उल्लंघन प्रकरणी काँग्रेस आमदार सिद्धार्थ कुशवाह यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. कोलगवां पोलीस ठाणे क्षेत्रातील नई बस्ती परिसरात रेशन मालाची मागणी करणाऱ्या नागरिकांना एकत्र घेऊन सिद्धार्थ कुशवाह यांनी मंगळवारी आंदोलन केले. सध्या देशात लॉकडाऊन असल्याने, राज्यात कलम १४४ लागू असल्याने आमदार कुशवाह यांचे हे कृत्य आपत्ती व्यवस्थापन कायद्याचे उल्लंघन आहे. त्यामुळे, पोलिसांनी याप्रकरणी कुशवाह यांच्यासह ८ जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप एकाही अटक करण्यात आली नाही.
नई बस्ती परिसरात स्वस्त धान्य वाटपाची व्यवस्था कोलमडली होती, नागरिकांना नीटप्रकारे हे धान्य वाटप करण्यात येत नव्हते. त्यामुळे गरीब आणि मजूरवर्ग रस्त्यावर उतरला होता, याची माहिती मिळाल्याने मी घटनास्थळावर पोहोचलो होतो, असे कुशवाह यांनी सांगितले. तसेच, तिथे पोहोचल्यानंतर मी या गरिबांसोबत रस्त्यावर आंदोलन सुरु केले, यावेळी शेकडो नागरिक येथे एकत्र आले होते, असेही त्यांनी म्हटले. याप्रकरणी, आमदार सिद्धार्थ कुशवाह, पप्पू साहू, राजकुमार विश्वकर्मा यांच्यासह ८ जणांविरुद्ध आयपीसीच्या कलम २६९, २७०, १८८, ३४ च्या आपत्ती व्यवस्थापन ५१ (ख) च्या कायद्यानुसार खटला दाखल करण्यात आला आहे.