उज्जैन - कोरोना व्हायरसच्या जगव्यापी साथीने प्रगत देशांना हतबल केले आहे. सर्वतोपरी प्रयत्न करूनही आव्हाने वाढत आहेत. एक-दुसऱ्यापासून दूर राहणे, घराबाहेर न पडणे, घरातच राहणे, हा एकमेव मार्ग आहे. यात जराही निष्काळजीपणा केल्यास भारताला जबर किंमत मोजावी लागेल. त्याचा अंदाज बांधणेही कठीण आहे, असं कळकळीने सांगत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशभरात 3 मे पर्यंत ‘लॉकडाऊन’ लागू करण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. मोदींनी लोकांना जेथे आहात तेथेच राहण्याचे आवाहन केले आहे. कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सर्व खबरदारीचे उपाय केले जात आहेत. अशातच एक धक्कादायक घटना समोर आली आहे.
देशातील विविध रुग्णालयात कोरोनाग्रस्तांवर उपचार सुरू आहेत. रुग्णालयातील कर्मचाऱ्यांना सुरक्षिततेच्यादृष्टीने विशेष काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र याच दरम्यान डॉक्टरांचा निष्काळजीपणा समोर आला आहे. मध्य प्रदेशच्या आरोग्य विभागाकडून एक मोठी चूक झाली आहे. आरोग्य विभागातील डॉक्टरांनी जिवंत असलेल्या कोरोना रुग्णाला मृत घोषित केले. मात्र त्या रुग्णाने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट करून मी जिवंत आहे असं म्हटलं आहे. उज्जैनमध्ये हा धक्कादायक प्रकार घडला असल्याची महिती मिळत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, रुग्णाने वर्तमानपत्रात आपल्या मृत्यूची बातमी वाचली आणि त्याला धक्काच बसला. त्याने आपण जिवंत असल्याचा एक व्हिडीओ तयार केला आणि तो सोशल मीडियावर अपलोड केला. आरोग्य विभागाने हा व्हिडीओ पाहिल्यावर संबंधित डॉक्टरांवर कारवाई केली आहे. 'मला दोन दिवसांपूर्वी आरडी गर्दी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मी एका वृत्तपत्रात वाचले की मला मृत घोषित करण्यात आले आहे. पण मी जिवंत आणि निरोगी आहे. कृपया हा व्हिडीओ इतरांसोबत शेअर करावा' असं रुग्णाने आपल्या व्हिडीओमध्ये म्हटलं आहे. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.
काही दिवसांपूर्वी चार कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट चुकून निगेटिव्ह समजून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. तामिळनाडूमधील विल्लूपूरमच्या रुग्णालयात ही धक्कादायक घटना घडली होती. चार कोरोनाग्रस्तांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला म्हणून त्यांना डिस्चार्ज देण्यात आला. मात्र त्यानंतर त्यांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह असल्याची माहिती समोर आली होती. देशातील कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा वेगाने वाढत आहे. गेल्या 24 तासांत देशभरात कोरोनाच्या 1396 नव्या रुग्णांचे निदान झाले आहे. तर याच काळात 48 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 381 जणांनी कोरोनाला मात दिली आहे. कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी देशभरात 3 मेपर्यंत लॉकडाऊन करण्यात आले आहे. आता या लॉकडाऊनचा कालावधी वाढवायचा की नाही याबाबत आज पंतप्रधान मोदी आणि विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांमध्ये होणाऱ्या बैठकीत निर्णय होणार आहे.
महत्त्वाच्या बातम्या
Coronavirus : लॉकडाऊनमध्ये WhatsApp ओपन न करता कोण, कधी ऑनलाईन आहे हे असं जाणून घ्या
coronavirus : देशातील कोरोनाबाधितांचा आकडा 28 हजारांजवळ, 24 तासांत 48 जणांचा मृत्यू
Coronavirus:...तर १५ मे पर्यंत मुंबईत कोरोनाचा हाहाकार माजेल; केंद्रीय टीमचा धक्कादायक अंदाज