नवी दिल्ली - देशात ८ हजार ३५६ कोरोना रुग्ण झाले आहेत. गेल्या २४ तासात ९०९ रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत २७३ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जवळपास ८० टक्के रुग्णांमध्ये कोरोनाचे सौम्य आणि मध्यम लक्षण आढळतात. तर २० टक्के रुग्णांना आयसीयूची गरज लागते त्यामुळे कुठेही कोरोनामुळे भीतीदायक वातावरण होऊ नये असं आवाहन केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून करण्यात आलं.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं की,संपूर्ण देशात १ लाख ५ हजार विशेष बेड्स कोविड १९ च्या रुग्णांसाठी सज्ज आहेत. तसेच कोरोनाग्रस्तांच्या उपचासाठी स्पेशल ६०१ हॉस्पिटल तयार ठेवण्यात आल्याची माहिती सहसचिव लव अग्रवाल यांनी दिली आहे.
कोरोनाग्रस्तांची वाढती संख्या पाहता केंद्र सरकार सर्वसोयीसुविधांसह सज्ज आहे. मागील २ महिन्यापासून देशात कोरोना संकटाशी मुकाबला करण्यासाठी तयारी करत आहे. डॉक्टर्स, नर्सेस आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना ट्रेनिंग दिलं जात आहे अशी माहिती दिली.
तसेच कोरोना रुग्णांवर उपचार करण्यासाठी विशेष हॉस्पिटलची सोय करण्यात आली आहे. प्रत्येक हॉस्पिटलमध्ये विशेष आरोग्य अधिकारी नियुक्त केला जात आहे. तामिळनाडूत ३५० खाटांचे हॉस्पिटल उभारण्यात आलं आहे. केरळात ९०० खाटांचे हॉस्पिटल कोरोनाग्रस्तांसाठी उभारण्यात आलं आहे. विविध राज्यात त्याठिकाणच्या सरकारच्या माध्यमातून फक्त कोरोनाग्रस्तांच्या उपचारासाठी उभारण्यात येत आहे. मुंबईत ७०० खाटांचे विशेष हॉस्पिटल सोयीसुविधांसह सज्ज आहे असंही सांगितले.
त्याचसोबत खासगी रुग्णालयांनाही सोबत घेऊन कोरोना संकटाशी मुकाबला करत आहोत. सगळेजण पुढाकार घेऊन कोरोनाच्या लढाईत योगदान देत आहे. लष्करानेही विशेष हॉस्पिटल करण्याची तयारी दाखवली आहे. २० हजार ट्रेन्सना आयसोलेशन वार्ड तयार करण्याचं काम सुरु आहे. देश कोरोना महामारीशी लढण्यास तयार आहे. विविध पातळीवर अनेक उपाययोजना केल्या आहेत. लोकांचे सहकार्य सरकारला गरजेचे आहे. सोशल डिस्टेंसिंगचं पालन तंतोतंत करावचं लागणार आहे. आपल्या वागणुकीतून आपण जगाला भारतीयांची एकता दाखवून देत आहोत असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने स्पष्ट केले.