नवी दिल्ली – कोरोना व्हायरसमुळे जगभरात संकट उभं राहिलं असून १७ लाखांहून अधिक लोकांना कोरोनाची लागण झाली आहे. जगातील २०० देशांना कोरोनाचा फटका बसला आहे. कोरोनाचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी मुख्यत: बहुतांश देशांनी लॉकडाऊनचा आधार घेतला आहे. मात्र कोरोना व्हायरसवर केलेल्या एका नवीन स्टडी रिपोर्टनुसार कोरोनावर जोपर्यंत लस उपलब्ध होत नाही तोवर लॉकडाऊन हटवू नका असं म्हटलं आहे.
चीनमध्ये कोरोना व्हायरसचं संक्रमण झालेल्या प्रकरणांवर अभ्यास करुन हा निष्कर्ष काढण्यात आला आहे. स्टडीत अशा देशांना सावधानतेचा इशारा दिला आहे. जे देश हळूहळू लॉकडाऊन हटवण्याचा विचार करत आहेत. लोकांचं सर्वसामान्य जीवन सुरळीत होण्यासाठी काही देश प्रयत्न करत आहेत.
इंडिपेंडेटच्या रिपोर्टनुसार हॉंगकॉंगमध्ये झालेल्या रिसर्चमध्ये म्हटलंय की, चीन जर निर्बंध शिथील करत असेल अशा परिस्थितीत लोकांची हालचाल वाढू शकते. त्यामुळे पुन्हा कोरोनाचं संक्रमण होण्याची शक्यता आहे. जर सरकार निर्बंध उठवण्याचा विचारात असेल तर त्यांना पुन्हा कोरोनाचा सामना करावा लागेल असं स्टडी रिपोर्टमध्ये म्हटलं आहे. हा स्टडी रिपोर्ट द लैसेंट नावाच्या मेडिकल जर्नलमध्ये छापण्यात आला आहे. यात चीनमधील सर्वाधिक कोरोनाचे हॉटस्पॉट असणाऱ्या १० परिसरातील प्रकरणांचा अभ्यास करण्यात आला आहे. यातील सर्वाधिक मृत्यू झालेल्या परिसराचाही अभ्यास करण्यात आला आहे.
चीनने सक्तीने लॉकडाऊनचं पालन केल्याने कोरोना व्हायरसचे नवीन संक्रमित रुग्ण कमी प्रमाणात आढळले. गेल्या काही दिवसात संक्रमणचं प्रमाण कमी झालं आहे. पण चीन सरकारने लॉकडाऊन हटवण्याचा निर्णय घेतल्यास पुन्हा कोरोनाचा धोका वाढेल. आर्थिक व्यवस्थेला चालना देण्यासाठी काही उत्पादन कंपन्या सुरु करता येतील पण सोशल डिस्टेंसिंगचं पालन आणि एकमेकांच्या संपर्कात येऊ नये हा उपाय आहे. पण जोपर्यंत कोरोनावर लस येत नाही तोपर्यंत लॉकडाऊन हटवणं धोक्याचं होऊ शकतं असं प्रोफेसर टी वू यांनी सांगितले आहे.
तसेच हा स्टडी रिपोर्ट अशा देशांनाही लागू होतो ज्याठिकाणी सुरुवातीच्या काळात लॉकडाऊन केला होता आणि आता त्याठिकाणी लॉकडाऊनचं शिथिलता आणण्याचा विचार सुरु आहे. यूकेमध्ये चार आठवडे झाले लॉकडाऊन सुरु आहे याठिकाणी कर्मचाऱ्यांना घरातून काम करण्यास सांगितले आहे. त्याठिकाणी बहुतांश दुकाने बंद आहेत असंही प्रोफेसर टी वू यांनी सांगितलं.