नवी दिल्ली - गेले १० महिने धुमाकूळ घातल्यानंतर देशातून कोरोनाचा प्रभाव आता बऱ्यापैकी ओसरू लागला आहे. त्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारने कोविड-१९ संदर्भात नवी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहे. यामध्ये सिनेमा हॉल आणि थिएटर्सना ५० टक्क्यांहून अधिक क्षमतेने संचालन करण्याची परवानगी देण्यात आली आहे. तसेच जलतरण तलाव सर्वांसाठी खुली करण्याची परवानगी देण्यात आली आहे. नव्या मार्गदर्शक सूचनांनुसार एका राज्यातून दुसऱ्या जाण्यास निर्बंध नसतील. तसेच त्यासाठी कुठल्याही प्रकारच्या परवानगीची गरज लागणार नाही.नव्या सूचनांमध्ये कन्टेन्मेंट झोन सोडून बाहेरील काही वगळून अन्य सर्व व्यवहारांना परवानगी देण्यात आली आहे. मात्र त्यासाठी एसओपीचे पालन करावे लागेल. केंद्र सरकारने जारी केलेल्या मार्गदर्शक सूचना पुढील प्रमाणे आहेत.सामाजिक, धार्मिक, क्रीडा, मनोरंजन, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक कार्यक्रम हॉलमध्ये ५० टके क्षमतेसह घेण्याची परवानगी दिली जाऊ शकते. तर बंद ठिकाणी २०० जणांना परवानगी असेल.संबंधित राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांना एसओपीनुसार अशा प्रकारच्या कार्यक्रमांना परवानगी दिली जाईल. सिनेमा हॉल आणि थिएटरमध्ये कमाल ५० टक्के क्षमतेने प्रवेश देण्यास परवानगी देण्यात आली होती. आता ते अधिक क्षमतेने उघडले जाऊ शकतील. त्यासाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून सूचना जारी केल्या जातील.खेळाडूंना स्विमिंग पूलच्या वापराची परवानगी आधीच देण्यात आली होती. आता स्विमिंग पूल सर्वांसाठी खुले करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. यासाठी क्रीडामंत्रालयाकडून सूचना जारी केल्या जातील. व्यावसायित प्रदर्शनांसाठी आधीच परवानगी देण्यात आली आहे. आता सर्व प्रकारच्या प्रदर्शन मेळाव्यांना परवानगी असेल. त्यासाठी गृहमंत्रालयाकडून मार्गदर्शक सूचना जारी केल्या जातील.गरज पडल्यास जिल्हा प्रशासनाकडून कन्टेन्मेंट झोनची ओळख पटवली जाईल. कन्टेन्मेंट झोनमध्ये संसर्ग रोखण्यासाठी आरोग्य मंत्रालयाडून जारी करण्यात आलेल्या नियमांचे पालन करावे लागेल. या नियमांचे पालन करवून घेण्याची जबाबदारी जिल्हा, पोलीस आणि स्थानिक प्रशासनाची असेल.आंतरराष्ट्रीय विमानसेवा सुरू करण्यासाठी नागरी विमान मंत्रालय, गृहमंत्रालयाकडून परिस्थितीचे आकलन करण्याच्या आधारावर निर्णय घेतला जाईल.